हरियाणातील 530 तरुण नोकरीसाठी इस्रायलला रवाना, 1.37 लाख रुपये मिळणार सॅलरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:10 AM2024-04-03T10:10:33+5:302024-04-03T10:11:19+5:30
हरियाणा सरकारने इस्रायलमधील नोकऱ्यांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली होती.
चंडीगड : हरियाणातून जवळपास 530 तरुण इस्रायलमध्येनोकरीसाठी रवाना झाले. या तरुणांची निवड हरियाणा कौशल्य विकास महामंडळाकडून करण्यात आली आहे. इस्रायलला जाण्यापूर्वी रोहतकमध्ये या तरुणांच्या मुलाखती झाल्या होत्या. यानंतर आता मंगळवारी सर्व तरुण इस्रायलला रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी 530 तरुण नवी दिल्लीहून इस्रायलला रवाना झाले. इस्रायलला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री नायब सैनी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी या तरुणांसोबत संवाद साधला.
दरम्यान, हरियाणा सरकारने इस्रायलमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली होती. यादरम्यान, जानेवारी महिन्यात रोहतकमध्ये सहा दिवस भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला होता. या कालावधीत 8199 तरुणांनी अर्ज केले होते. मंगळवारी इस्रायलला रवाना होण्यापूर्वी तरुणांनी हरियाणा सरकारचे आभार मानले. मुख्यमंत्री नायब सैनी यांनीही तरुणांचे अभिनंदन केले. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनीही तरुणांशी संवाद साधत तरुणांनी राज्य आणि देशाला गौरव मिळवून देण्यासाठी काम करावे, असे सांगितले.
इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत इस्रायलमध्ये कामगारांची कमतरता आहे. इस्रायलने भारताला कामगार पाठवण्याची विनंती केली होती. इस्रायलकडून 10,000 कंस्ट्रक्शन वर्कर्सची मागणी होती. यामध्ये फ्रेमवर्क, शटरिंग, कारपेंटर, प्लास्टरिंग, सिरॅमिक टाइल अशा कामगारांचा समावेश आहे. आता या कामगारांना 1,37,000 रुपये प्रति महिना पगार मिळणार आहे. याशिवाय वैद्यकीय विमा, भोजन आणि निवासाची सुविधाही देण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक महिन्याला 16,515 रुपयांचा बोनस देखील मिळेल.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील यशानंतर हरियाणा सरकार दुसऱ्या टप्प्यासाठी रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी करत आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया कधी सुरु होणार, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.