प्रतिवर्षी ६० ते ८० लाख, २० विद्यार्थ्यांना पॅकेज; IIT त १९०हून अधिक जणांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 08:54 AM2023-12-04T08:54:57+5:302023-12-04T08:55:23+5:30
वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या संधी देण्याचे प्रमाण अधिक आहे. साधारण २० विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीच्या संधी परदेशी कंपन्यांकडून आहेत
मुंबई : गेली दोन दिवस पवईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत (आयआयटी) सुरू असलेल्या नोकरीसाठीच्या मुलाखत सत्रात (प्लेसमेंट सीझन) १९३ विद्यार्थ्यांनी ऑफर्स स्वीकारल्या आहेत.
वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या संधी देण्याचे प्रमाण अधिक आहे. साधारण २० विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीच्या संधी परदेशी कंपन्यांकडून आहेत. कोट्यवधीचे पॅकेज देण्यात सॅमसंग कंपनीचा समावेश होता. या शिवाय क्लालकॉमने २० हून अधिक विद्यार्थ्यांना निवडले आहे. या विद्यार्थ्यांना साधारण ६० ते ८० लाखांपर्यंतची पॅकेजेस दिल्याचा अंदाज आहे. जपानच्या हॉंडा कंपनीकडून संशोधनासाठी ७० लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. सिंगापूरच्या बार्कलेजनेही एक कोटीचे पॅकेज दिल्याची माहिती आहे.
इतर आयआयटींमध्ये काय आहे चित्र?
रूरकीच्या आयआयटीतील एका विद्यार्थ्याला अमेरिकेतील डेटाब्रिक्स या सॉफ्टवेअर कंपनीकडून २ कोटींपर्यंतची ऑफर मिळाली. हे आजवरचे सर्वोच्च पॅकेज होते. या संस्थेत प्री प्लेसमेंटसह ४४० विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. खरगपूरच्या आयआयटीत पहिल्या दिवशी १९ विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या संधी दिल्या गेल्या. जवळपास ६० विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर कंपनीत नोकऱ्या मिळाल्या. दिल्लीच्या आयआयटीत पहिल्या दिवशी ४८० विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या. यात मायक्रोसॉफ्ट, गोल्डमन सॅशे, टेक्सस इन्स्ट्रुमुेंट आदी कंपन्यांनी भाग घेतला. मायक्रोसॉफ्टने कॅम्पसमधून १८ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र दिले.