येत्या पाच वर्षांत ९.२ कोटी नोकऱ्या संपणार; १७ कोटी नवीन निर्माण होणार, हे सेक्टर धोक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 21:25 IST2025-01-21T21:23:45+5:302025-01-21T21:25:46+5:30
Job Alert: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या सर्वांच्या केंद्रस्थानी असून जागतिक कामगार संघटनेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. एआयसोबतच अन्य काही गोष्टी या नोकऱ्यांच्या संपण्यासाठी कारणीभूत असणार आहेत.

येत्या पाच वर्षांत ९.२ कोटी नोकऱ्या संपणार; १७ कोटी नवीन निर्माण होणार, हे सेक्टर धोक्यात...
एकीकडे नवे रोजगार कसे निर्माण होतील, नवीन नोकऱ्या कशा मिळतील यासाठी सरकारे, तरुण धडपडत असताना येत्या पाच वर्षांत तब्बल ९.२ कोटी नोकऱ्या संपणार आहेत. एकीकडे ही आकडेवारी धक्कादायक असताना दुसरीकडे नवीन १७ कोटी नोकऱ्या निर्माण होणार असल्याचा अहवाला प्रसिद्ध झाला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या सर्वांच्या केंद्रस्थानी असून जागतिक कामगार संघटनेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. एआयसोबतच अन्य काही गोष्टी या नोकऱ्यांच्या संपण्यासाठी कारणीभूत असणार आहेत. या अहवालानुसार २०२५ ते २०३० या येत्या पाच वर्षांत जगभरातील जवळपास २२ टक्के नोकऱ्या प्रभावित होणार आहेत. यामध्ये १७ कोटी नवीन संधी निर्माण होणार तर ९.२ कोटी नोकऱ्या संपुष्टात येणार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी रोजगार निर्मितीत सात टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
तांत्रिक बदल, जागतिक आर्थिक अनिश्चितता, लोकसंख्याशास्त्रीय बदल, हरित संक्रमण आणि भू-आर्थिक आव्हाने हे पाच मुख्य घटक यास कारणीभूत असणार आहेत. प्रत्येक कामासाठी होणार असलेला डिजिटलचा वापर यात महत्वाची भूमिका निभावणार आहे. एआय, माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ऑटोमोटिव्ह इत्यादी यामध्ये भूमिका बजावतील. राहणीमानाचा वाढता खर्च हा एकूणच दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात परिवर्तनकारी घटक असल्याचे मानले जात आहे.
कंपन्यांसमोरही आव्हाने...
कंपन्यांा २०३० पर्यंत त्यांच्या व्यवसायात परिवर्तन होईल अशी ५० टक्के आशा आहे. यामुळे ४२ टक्के व्यवसायांमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे. मंद आर्थिक वाढीमुळे जागतिक स्तरावर १.६ दशलक्ष नोकऱ्या जाण्याची अपेक्षा आहे.
सर्वात वेगाने वाढणारे रोजगार क्षेत्र
बिग डेटा स्पेशालिस्ट
फिनटेक अभियंता
एआय आणि मशीन लर्निंग स्पेशालिस्ट
सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन डेव्हलपर
सुरक्षा व्यवस्थापन तज्ञ
डेटा वेअरहाऊसिंग स्पेशालिस्ट
स्वायत्त आणि इलेक्ट्रिक वाहन विशेषज्ञ
UI आणि UX डिझायनर
हलके ट्रक आणि डिलिव्हरी सेवा चालक
डेटा विश्लेषक आणि शास्त्रज्ञ
पर्यावरण अभियंता
माहिती सुरक्षा विश्लेषक
डेव्हऑप्स अभियंता
अक्षय ऊर्जा अभियंता
वेगाने घटणारे रोजगार क्षेत्र
पोस्टल सर्व्हिस लिपिक
बँक टेलर आणि संबंधित क्लर्क
डेटा एन्ट्री क्लार्क
रोखपाल आणि तिकीट क्लार्क
प्रशासकीय सहाय्यक आणि कार्यकारी सचिव
छपाई आणि संबंधित व्यवसायांचे कर्मचारी
साहित्य, रेकॉर्डिंग आणि स्टॉक कीपिंग लिपिक
वाहतूक परिचर आणि वाहक
घरोघरी विक्री सेवा कर्मचारी
रस्त्यावरील विक्रेता
ग्राफिक डिझायनर
दावे समायोजक
परीक्षक आणि तपासकर्ता
कायदेशीर अधिकारी
कायदेशीर सचिव
टेलिमार्केटर