खादीमुळे ९.४५ लाख नोकऱ्या; तरूणांना भुरळ, वृत्त निवेदकही दिसणार खादी कपड्यांत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 07:38 AM2023-09-21T07:38:29+5:302023-09-21T07:38:43+5:30
खादी ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोजकुमार यांच्या उपस्थितीत दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या
नवी दिल्ली : स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा राहिलेली खादी आजच्या तरुणांतही तेवढीच लोकप्रिय असून गेल्या वित्त वर्षात खादीची १.३४ लाख कोटी रुपयांची विक्री झाली आहे. तसेच ९.५४ लाख नोकऱ्याही खादी ग्रामोद्योगाने निर्माण केल्या आहेत. खादी उद्योगास आणखी गती देण्यासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्यम मंत्रालयाने ३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
खादी ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोजकुमार यांच्या उपस्थितीत दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यानिमित्ताने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या लाभार्थींना १५० कोटी रुपयांच्या सबसिडीचे वितरण मनोजकुमार यांच्या हस्ते झाले.
प्रसार भारती, डीआयसी यांच्यासोबत करार
यातील एक करार प्रसार भारतीसोबत करण्यात आला. या करारान्वये डीडी न्यूज आणि डीडी इंटरनॅशनल चॅनलचे निवेदक खादीचे कपडे परिधान करतील. खादी आणखी लोकप्रिय करण्यात याचा उपयोग होईल. दुसरा करार ‘एनबीसीसी इंडिया लिमिटेड’सोबत करण्यात आला. या करारान्वये खादी ग्रामोद्योगासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी ‘एनबीसीसी’ला सोपविली. खादी ग्रामोद्योगास आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी ‘डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन’सोबत (डीआयसी) एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
पोर्टलचे विमोचन
या तिन्ही करारामुळे खादी ग्रामोद्योगास मोठा लाभ होईल. प्रसार भारतीसोबतच्या करारामुळे खादीला तरुणांत लोकप्रियता मिळण्यास मदत होईल. यानिमित्ताने एका ‘एटीआर पोर्टल’चे विमोचनही करण्यात आले. त्याद्वारे आयोगाच्या विविध योजनांचे नियमन करणे सोपे होईल.