आकर्षक पॅकेजिंगचे करियर, अनुभवी डिझायनरला मिळतो भरघोस पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:49 AM2023-05-03T10:49:01+5:302023-05-03T10:49:14+5:30
पॅकेजिंग म्हणजे काय, हे जाणून घेतले, तर प्रथमदर्शनी आपल्या लक्षात येईल की, बाजारातील कोणत्याही वस्तूच्या भोवती गुंडाळलेले वेष्टन किंवा आकर्षक आवरण.
गेल्या काही वर्षांत पॅकेजिंग क्षेत्राचे महत्त्व अधिक वाढले आहे. जाहिरात क्षेत्रात एखाद्या उत्पादनाचा विचार करताना पॅकेजिंगविषयी विचार करण्यासाठी क्रिएटिव्ह टीम असते. ही टीम पॅकेजिंगबाबत ग्राहक, व्यावसायिक, वितरण, विपणन अशा सर्व बाजूंनी विचार करीत असते. त्यामुळे एखाद्या उत्पादनाच्या पॅकेंजिगचा भावही वधारला आहे, त्यामुळे आता पॅकेजिंग क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्यासाठी करिअरची ही अनोखी वाट हटके पर्याय ठरू शकते.
पॅकेजिंग म्हणजे काय, हे जाणून घेतले, तर प्रथमदर्शनी आपल्या लक्षात येईल की, बाजारातील कोणत्याही वस्तूच्या भोवती गुंडाळलेले वेष्टन किंवा आकर्षक आवरण. सत्तरच्या दशकापर्यंत कोणत्याही वस्तूच्या विक्रीसाठी पॅकिंग म्हणून कोऱ्या कागदी पिशव्या किंवा वर्तमानपत्राचा वापर केला जात असे. हळूहळू कागदाऐवजी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. प्लास्टिक टिकाऊ आणि चमकदार असल्याने त्याच्यावर वस्तूचे नाव आणि कंपनीची जाहिरात करणे सुरू झाले. गेल्या ५० वर्षांत याचा इतका प्रसार आणि प्रचार झाला की, वस्तूच्या दर्जापेक्षा त्याच्या बाहेरील आवरण किती आकर्षक यावर त्याची विक्री किंवा मागणी ठरू लागली. पॅकेजिंग ही आता काळाची गरज आहे व त्यात संधीही विपुल प्रमाणात आहेत. तरुणांनी या संधीचे सोने करावे.
उत्तम पॅकेजिंगसाठी उत्तम प्रिंटिंग व आकर्षक डिझायनिंग, तसेच फोटो हे आवश्यक असतात. म्हणून छायाचित्रण, छपाई हे नवीन पॅकेजिंगला पूरक म्हणून करिअर आहे. प्लास्टिकचा वापर वाढल्याने प्लास्टिक टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले, तर पॅकेजिंग क्षेत्रात त्याला खूप मागणी आहे. दुग्धजन्य पदार्थ, फूड प्रॉडक्टससाठी पॅकेजिंग महत्त्वाचे असल्याने डेअरी टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम करणाऱ्यांना पॅकेजिंगमध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. पॅकेजिंगचा कोर्स करून पेन व साहित्य (शालेय) व्यवसायात नोकरी किंवा व्यवसाय करू शकतो.
वस्तूचे डिझाइन करण्यासाठी कंपन्या जाहिरात एजन्सीबरोबर करार करतात किंवा कंपन्या स्वत:च अशा कामासाठी डिझायनरची नेमणूक करतात. सध्या चांगल्या व अनुभवी डिझायनरला भरघोस पगार मिळतो. कंपन्यांमध्ये सध्या पॅकेजिंग डेव्हलपमेंट असा नवीन विभाग असतो. तिथे संशोधन करीत आपले उत्पादन कसे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार व आकर्षक करता येईल यावर भर दिला जातो.
प्रिंटिंग टेक्नॉलॉजी हा तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. त्यात प्रिंटिंगचे सर्व प्रकार उदा. लेटर प्रेस ऑफसेट, रोटो ग्रॅवुअर, स्क्रीन प्रिंटिंग व डिजिटल प्रिंटिंग हे शिकविले जातात. यात पदविका व पदवी असे दोन्ही कोर्स दहावी किंवा बारावीनंतर आहेत. डिप्लोमा इन पॅकेजिंग हा कोर्स दोन वर्षे पूर्णवेळ व दीड वर्ष करस्पॉण्डन्स स्वरूपात उपलब्ध आहे. पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी विज्ञान पदवी व करस्पॉण्डन्स अभ्यासक्रमासाठी पाच वर्षे नोकरीचा अनुभव हवा.