१२ दिवसांनंतर चांदी पुन्हा ७० हजारावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 10:03 AM2021-07-03T10:03:07+5:302021-07-03T10:03:35+5:30
सोनेही ४८ हजारांच्या पुढे : रुपयाच्या घसरणीचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चढ-उतार होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात वाढ होऊन १२ दिवसांनंतर चांदी पुन्हा एकदा ७० हजार रुपये प्रतिकिलोच्या पुढे पोहोचली आहे तसेच सोन्याच्याही भावात वाढ होऊन ते ४८ हजारांच्या पुढे गेले आहे. डॉलरचे दर वाढल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
बाजारपेठ अनलॉक झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांचा अपवादवगळता सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत होती. मात्र, दोन दिवसांपासून या मौल्यवान धातूंचे भाव वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीमध्ये भाववाढ होत राहिली. अनलॉकनंतर सुवर्णपेढ्या सुरू झाल्या व भाव वाढत जाऊन १० जूनला चांदी ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती. मात्र, ११ रोजी त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७३ हजार ५०० रुपयांवर आली. त्यानंतर सातत्याने घसरण होत जाऊन १८ जून रोजी ७१ हजार ५०० रुपयांवर आली व १९ रोजी एकाच दिवसात दोन हजाराची घसरण होऊन ती ६९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. ही घसरण होत जाऊन २८ जून रोजी ६९ हजारांवर आली. \त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी चांदी ७० हजारांच्या पुढे जाऊन ७० हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. २ जुलैला मात्र त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७० हजार रुपये प्रतिकिलोवर आली. १९ जूनपूर्वी ७० हजारांच्या पुढे असलेली चांदी या भाववाढीमुळे १२ दिवसांनतर १ जुलैला पुन्हा ७० हजारांच्या पुढे गेली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात वाढ होत जाऊन २ जुलैला सोने ४८ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
डॉलरच्या दरवाढीमुळे गुंतवणूक वाढली
भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर वाढत असल्याने सोने-चांदीत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. जून महिन्यात ७३ ते ७४ रुपयांवर असलेल्या डॉलरचे दर जुलै महिना सुरू होताच २ जुलै रोजी दर ७४.८० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सोने-चांदी वधारत असल्याचे सांगण्यात येत आहे.