‘५जी’नंतर देशातील नाेकरभरतीलाही ‘स्पीड’; टेलिकाॅम क्षेत्रात नाेकरभरतीत माेठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 05:56 AM2022-10-14T05:56:07+5:302022-10-14T05:56:19+5:30
माॅन्स्टर एम्प्लाॅयमेंट इंडेक्सच्या सप्टेंबरमधील आकडेवारीतून हे माहिती मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम आणि ५जी सेवेच्या लाॅंचिंगमुळे देशात राेजगाराबाबत पाॅझिटिव्ह वातावरणाची निर्मिती झाली आहे. कंपन्यांमध्ये नाेकर भरतीला वेग आला आहे. विशेषत: टेलिकाॅम क्षेत्रातील भरतीमध्ये सुमारे १३ टक्के वाढ नाेंदविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आयात आणि निर्यात क्षेत्रात सर्वाधिक २८ टक्के नाेकर भरती वाढली आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे सकारात्मक संकेत आहेत.
माॅन्स्टर एम्प्लाॅयमेंट इंडेक्सच्या सप्टेंबरमधील आकडेवारीतून हे माहिती मिळाली आहे. ऑक्टाेबरमध्ये देशात ५जी सेवेचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले. सुरुवातीला काही निवडक शहरांमध्येच ५जी उपलब्ध आहे. मात्र, दिवाळीपर्यंत आणखी काही शहरांमध्ये विस्तार हाेणार आहे, तर पुढील वर्षी देशातील बहुतांश शहरांमध्ये ५जी माेबाईल सेवा उपलब्ध असेल. ५जी सेवेचा विस्तार पाहता टेलिकाॅम क्षेत्रात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.
टेलिकाॅम कंपन्या त्यांच्या डेटा सेंटर्सच्या क्षमतेत वाढ करणार आहेत. याशिवाय विशेषज्ञता असलेल्या पदांवर या कंपन्यांमध्ये भरती सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे.
उत्पादन आणि रेटेल सेक्टरमध्ये वाढ
सणासुदीच्या काळात उत्पादन आणि रिटेल सेक्टरमध्ये प्रत्येकी ५ टक्के नाेकर भरती वाढली आहे.
ॲपेरल, वस्त्राेद्याेग आणि दागिन्यांच्या क्षेत्रात ११ टक्के वाढ झाली आहे.
आयात आणि निर्यात क्षेत्र आघाडीवर
काेराेनानंतर कंपन्यांनी विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच यावर्षी सणासुदीचा हंगाम जाेरात आहे. त्यामुळे या क्षेत्रात सर्वाधिक २८ टक्के नाेकर भरती झाली.