मनासारखा जॉब मिळत नाही? मग जो मिळेल तो जॉब करा, कारण....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:42 PM2017-09-11T13:42:28+5:302017-09-11T13:43:46+5:30
रिकामपण खातं, त्याचे घातक परिणाम आरोग्यावर होतात.
मी गॅप घेतलीये, आय अॅम फ्री, आय रिझाईन अशी स्टेटस आताश फेसुबकवर दिसतात. लोक त्यांचं अभिनंदन करतात. काहींना मत्सरही वाटतो की आपण काय नोकरीच्या घाण्याला जुंपलोय. लोक कसे राजीनामा देऊन मोकळे होतात. काही जणांना वाटतं की चांगला जॉब मिळाल्याशिवाय अजिबात कुठं नोकरीच करणार नाही. त्यापेक्षा अभ्यास करीन. खाईन तर तुपाशीच असा त्यांचा अॅटिटय़ूड. पण असं नोकरीसोडून घरी बसणं महागात पडू शकतं, म्हणजे आर्थिकदृष्टयाच नाही तर तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावरही त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे नोकरी नसण्यापेक्षा नोकरी असलेली बरी हे कायम लक्षात ठेवा.
अलिकडे एका ब्रिटिश संस्थेचा अभ्यास प्रसिद्ध झाला. हा अभ्यास युके हाऊसहोल्ड स्टडी नावानं उपलब्ध आहे. तर नोकरी बदलणार्या, नोकरी बदलून नवी नोकरी शोधण्याच्या काळात असलेल्या, ट्राझिटमधल्या, गॅप घेतलेल्या, रागानं तडकाफडकी राजीनामा देऊन घरी बसलेल्या, ऑफिसनं नारळ दिलेल्या अनेकांचा या सव्र्हेस अभ्यास करण्यात आला. आणि अभ्यास कशाचा तर नोकरी नसतानाच्या काळात यांच्या आरोग्यावर काय परिणाम झाले याचा. ते परिणाम मानसिक, शारीरिक, स्ट्रेस लेव्हल, र्हदय विकार, पचनशक्ती, प्रतिकारशक्ती या वेगवेगळ्या टप्प्यात मोजले गेले. आणि त्यात असं दिसून आलं की, मानसिक ताण प्रचंड वाढलेला असतो. त्यातून एकटेपणा येतो. रुटीन बिघडतं. आर्थिक ताण असताताच. त्यात पचनक्षमता बिघडते. आरोग्य घसरतं. आणि एकुणच आरोग्याची वाताहात होते.
त्या तुलनेत अशा माणसांचं आरोग्य बरं दिसतं जे नोकरीला चिकटून होते. नोकरीवर नाराज होते, कमी पैसे मिळतात म्हणून नाखुश होते, त्यांना नोकरीत ताण होता, जीव नको झाला म्हणत होते तरी त्यांचं आरोग्य हे नोकरी सोडून घरी बसणार्यांपेक्षा चांगलं होतं.
ही परिस्थिती जर ब्रिटनमधली असली तर आपल्याकडे मुळातच नोकर्यांची चणचण असताना हवा तसा जॉब मिळाल्याशिवाय नोकरीत करणार नाही, हा अॅटिटय़ूड नुस्ता घातकच नाही तर वेडगळ ठरू शकतो.
त्यापेक्षा आपल्या क्षेत्रातला जो त्यातला त्यात बरा वाटेल तो जॉब घ्या. तिथं शिका. पुढची संधी मिळण्याची वाट पहा. रिकामपण फार वाईेट हे लक्षात ठेवा.