कॉलेजात आहात? तरी सोशल ड्रिंक करता मग तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:05 PM2017-09-23T13:05:51+5:302017-09-23T13:06:00+5:30
इस्त्रायलचा एक अभ्यास सांगतो, जी मुलं कॉलेजात असल्यापासून दारूच्या व्यसनात अडकतात, त्यांना नोकर्या मिळण्याची शक्यता कमी असते.
प्यावे की पिऊ नये हा व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असला तरी दारू हे व्यसन आहे हे तर सर्वमान्य आहे. त्यात हल्ली सोशल ड्रिंकचं वारं कॉलेजातही पोहचलं आहे. अनेकजण कॉलेजची पायरी चढत नाही तोच मित्रांच्या दबावामुळे, फॅशन म्हणून, स्टाईल म्हणून, अनुभव घ्यायचा म्हणून, बंडखोरी म्हणून किंवा निव्वळ व्यसन म्हणून दारू प्यायला लागतात. म्हणतात की आम्ही कधीमधीच पितो. महिन्यातून फार तर दोनदा किंवा चारदा. पण हे एवढंही पिणं, तुमच्या करिअरवर वाईट परिणाम करू शकतो, तुमची नोकरी मिळण्याची शक्यताच कमी होऊ शकते.
इस्त्रायलच्या तेल अवीव विद्यापीठातील पीटर बम्बर्गर यांनी केलेला हा अभ्यास अलिकडेच एका सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. 2014 ते 2016 या काळात महाविद्यालयात शिकणार्या 827 मुलांशी बोलून त्यांनी हा अभ्यास केला.
त्यांचं म्हणणं आहे की, जी मुलं कॉलेजात सर्रास ड्रिंक करतात, त्यांचे फोटो सोशल मीडीयात टाकतात, अभ्यासाकडे त्यातून दुर्लक्ष्य करतात, लेट नाईट जागतात त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता अन्य मुलांपेक्षा किमान 10 टक्के कमी होते. आणि नोकरी मिळाली तरी ती टिकण्याची शक्यताही कमी होते.
त्यामुळे तुम्ही कॉलेजातच प्यायला लागला आहात, तर व्यसनाचं कीड स्वतर्ला लावून घेताहात हे लक्षात ठेवा.