मोठी संधी! स्टेट बँक ऑफ इंडियात बना अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 11:43 AM2023-05-10T11:43:40+5:302023-05-10T11:44:10+5:30
स्टेट बँक ऑफ इंडियातील २१७ विशेष अधिकारी पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन पद्धतीने १९ मे २०२३ पर्यंत अर्ज करायचा आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियातील २१७ विशेष अधिकारी पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन पद्धतीने १९ मे २०२३ पर्यंत अर्ज करायचा आहे. स्टेट बँकेचे व्यवहार लोकाभिमुख व्हावेत, स्टेट बँकेच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविणे, संगणक प्रणाली हाताळणे, बँकेच्या कायदेशीर बाबी तपासणे, मनुष्यबळाचा योग्य वापर, बँकेचे नियोजन, कर्मचारी व ग्राहक प्रशिक्षण यासाठी स्टेट बँकेत विशेष अधिकाऱ्यांची गरज असते.
स्टेट बँकेत करिअरच्या व्यापक संधी, चांगले वेतन, विविध प्रकारचे भत्ते, भरपूर सुविधा यामुळे स्टेट बँकिंग क्षेत्र युवावर्गासाठी मोठी पर्वणी ठरत आहे. स्टेट बँकेत संगणक प्रणाली हाताळण्यासाठी माहिती तंत्रज्ञान अधिकाऱ्यांची गरज असते. स्टेट बँकेच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषिक्षेत्र अधिकाऱ्यांची गरज असते. स्टेट बँकेच्या तांत्रिक बाबी तपासण्यासाठी तांत्रिक अधिकाऱ्यांची गरज असते. स्टेट बँकेच्या कायदेशीर बाबी तपासण्यासाठी विधी अधिकाऱ्यांची गरज असते. बँकेच्या आर्थिक बाबी तपासण्यासाठी सी. ए.ची गरज असते.
वयोमर्यादा किमान २१ वर्षे व कमाल ३० वर्षे अशी आहे. इतर मागास वर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे, अनुसूचित जाती, जमातीसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे अशी आहे.
या विशेष अधिकारी पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर मुलाखत घेण्यात येते. ऑनलाइन परीक्षेत दोन पेपर असतात.
यासाठी होते भरती
प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींसाठी मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट, क्रेडिट ॲनॅलिस्ट मॅनेजमेंट, वरिष्ठ विशेष कार्यकारी अधिकारी, उपमुख्य तांत्रिक अधिकारी, विविध विभागांतील व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, फायर इंजिनीअर यांसारख्या विविध पदांसाठी विशेष अधिकाऱ्यांची भरती केली जाते.
या पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. या पदांसाठी लेखी परीक्षा न घेता मुलाखत होते, निवड झालेल्या उमेदवारांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती होते.
पेपर क्रमांक १
तीन घटकांवर आधारित असतो. हा पेपर १२० गुणांचा व ९० मिनिटांचा असतो. यात १) इंग्रजी ५० प्रश्न, ५० गुण २) क्वांटिटेटिव्ह ॲटिट्यूड ३५ प्रश्न, ३५ गुण ३) रीजनिंग ॲबिलिटी ३५ प्रश्न, ३५ गुण असे गुणविभाजन असते.
पेपर क्रमांक २
हा व्यावसायिक ज्ञानावर आधारित असतो. यात १०० गुणांसाठी ५० प्रश्न विचारलेले असतात. परीक्षेचा कालावधी ४५ मिनिटे असतो. ऑनलाइन परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलविले जाते. निवड केलेल्या उमेदवारांना परिविक्षाधीन कालावधीनंतर स्टेट बँकेत विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती दिली जाते.