व्हा ‘यंत्र-मित्र इंजिनीअर’ काय आहे हे इंजिनीअरिंग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:50 AM2018-05-16T02:50:04+5:302018-05-16T02:50:27+5:30
इंजिनीअरिंग ही विज्ञानाची अशी एक उपशाखा आहे. ज्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समाजाला उपयोगी होईल, अशा साधनांची निर्मिती होते
डॉ. श्रेया उदारे, करिअर काउंन्सिलर
इंजिनीअरिंग ही विज्ञानाची अशी एक उपशाखा आहे. ज्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समाजाला उपयोगी होईल, अशा साधनांची निर्मिती होते. जी व्यक्ती या इंजिनीअरिंगचा अभ्यास करते आणि त्याचा उपयोग विविध यंत्रांच्या निर्मितीसाठी करते, त्यालाच इंजिनीअर (अभियंता) असे म्हटले जाते. इंजिनीअरिंगमध्ये प्रामुख्याने विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान अशा तीनही शाखांचा संगम होऊन, त्यायोगे यांत्रिक मदतीने मानवाचे जीवन सुलभ करणे अंतर्भूत आहे.
इंजिनीअर या व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात. जसे की, कुशल संघटक, उत्तम संवादक, चांगली आखणी करू शकणारा, समस्यांचे निराकारण करणारा. इंजिनीअरिंगचे विश्व खूप व्यापक आहे. याचे कारण की, इंजिनीअरिंगच्या अनेक उपशाखा आहेत, ज्या एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. या सर्व शाखांमध्ये आजच्या विद्यार्थांना आपले भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी अनेक संधी आहेत, परंतु सर्वप्रथम आपण या शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठीची शैक्षणिक पात्रता बघू या.
आज आपण विज्ञानाच्या युगात वावरत आहोत. आपल्या पटकन लक्षात येत नाही, पण आपले जीवन विज्ञानाच्या साहाय्याने खूप सुखकर आणि सोपे झाले आहे. सोप्यातली सोपी गोष्ट म्हणजे नळ सोडला की पाणी येणे, बटण दाबले की, टीव्ही, फ्रीज चालू होणे हे सर्वज्ञात आहे; परंतु आपले रोजचे जीवन सुखकर करण्यामागे जर कोणत्या शाखेचे महत्त्वपूर्ण योगदान असेल, तर ती म्हणजे इंजिनीअरिंग. भारतासारख्या विकसनशील देशाला तर या शाखेचे महत्त्व अधिकच.
>इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेण्याचे दोन मार्ग आहेत
पदवी - बारावीमध्ये विज्ञान शाखेतून पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र व गणित हे विषय घेणे गरजेचे असून, बारावीनंतर ४ वर्षांच्या बीई/ बी-टेक या कोर्ससाठी प्रवेश घेता येतो . डिप्लोमा - यामध्ये दहावीनंतर ३ वर्षांचा डिप्लोमा करून, पुढे बीई/ बी-टेकच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळतो. बीई/ बी-टेक करून पुढे उच्च शिक्षणासाठी एम.ई/एम.टेक (२ वर्षे)सुद्धा करता येते, तसेच परदेशी जाऊन एमएस (मास्टर आॅफ सायन्स)देखील बीई/ बी-टेकनंतर करता येऊ शकते, परंतु या क्षेत्रात बारावीच्या बरोबरीने मुलांना प्रवेश परीक्षा ही द्याव्या लागतात. त्यामुळे प्रवेश पात्र ठरण्यासाठी या दोन्ही परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविणे आवश्यक आहे.
>इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षा
महाराष्ट्र टेक्निकल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट,
जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन,जेईई मेन जेईई अॅडवान्स