व्हा ‘भौतिक-उपचार’ देणारा फिजिओथेरपिस्ट..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 02:19 AM2018-06-30T02:19:36+5:302018-06-30T02:20:05+5:30
आपल्या देशाला प्राचीन काळापासून वैद्यकीय परंपरा लाभली असून, वैद्यक शास्त्रातील अनेक बाबींवर आपण संशोधन करत आहोत. कालानुरूप अनेक उपचारपद्धतीही विकसित झालेल्या आहेत.
आपल्या देशाला प्राचीन काळापासून वैद्यकीय परंपरा लाभली असून, वैद्यक शास्त्रातील अनेक बाबींवर आपण संशोधन करत आहोत. कालानुरूप अनेक उपचारपद्धतीही विकसित झालेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘फिजिओथेरेपी’. याचा एकंदरीत अर्थ भौतिक-उपचार असा होतो. भौतिकशास्त्रातील काही सिद्धांताचा वापर मानवी आरोग्यासाठी या पद्धतीच्या माध्यमातून केला जातो. आजमितीस तीनशेहून जास्त फिजिओथेरेपी संस्था देशात पाहावयास मिळतात. आरोग्याविषयीची वाढती जागरूकता पाहता, या क्षेत्रात करिअर
करण्याच्या अनेक संधी आता उपलब्ध होत आहेत.
फिजिओथेरपिस्टची गरज
शरीराचा एखादा सांधा दुखत असेल, तर तो का दुखतोय, हे फिजिओथेरेपिस्ट तपासतात. कारण फिजिओथेरेपी म्हणजे नुसतेच शरीराला व्यायाम देणे नसते. सांध्यामध्ये वंगण कमी झालेले
असते. ते काढावे लागते.
विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट दिल्यानंतर तो
सांधा दुखायचा थांबतो. या ट्रीटमेंटसोबत काही औषधेही द्यायची असतात. प्रत्येक वेळेला सांधा दुखतोय म्हणजे, त्याचे आॅपरेशनच करायलाच लागते, हा चुकीचा गैरसमज आहे. सांध्यातील इंटर्नल स्टेरॉइड्स का कमी झाली, हे फक्त फिजिओथेरेपिस्टच जाणतो.
पात्रता : या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी बारावी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यात बॅचलर आॅफ फिजिओथेरेपी (बीपीटी) ही पदवीही संपादित करता येते, तसेच पदव्युत्तर पदवी मास्टर आॅफ फिजिओथेरेपी (एम.पी.टी.) घेता येईल. या विषयात पीएच.डी अभ्यासक्रमही पूर्ण करता येतो. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षाही घेतली जाते. त्यातून गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो, तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांसाठी आंतरवासिताही करावी लागते. फिजिओथेरेपिस्टकडे विषयातील प्रभुत्वाबरोबरच उत्तम संवाद कौशल्य असणेही आवश्यक आहे, तसेच धैर्याने प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याची तयारी हवी.
संधी : फिजिओथेरेपीमध्ये आॅर्थोपेडिक फिजिओथेरेपी, न्यूरोलोजी फिजिओथेरेपी, कार्डिओलॉजी आणि रेस्पीरेटरी फिजिओथेरेपी, स्पोर्ट्स फिजिओथेरेपी, कम्युनिटी फिजिओथेरेपी असे प्रकार आहेत. सरकारी, खासगी इस्पितळे किंवा काही खासगी संस्थात काम मिळू शकते, तसेच स्वत:ची प्रशिक्षण संस्थाही सुरू करता येते. पगाराची सुरुवात २० हजारांपासून होते आणि अनुभवानंतर ती वाढूही शकते. शरीर रचना, शरीर क्रिया, शरीर कार्य, शस्त्रक्रिया, औषधशास्त्र, स्त्रीरोग आणि प्रसूती शास्त्र, अस्थिरोग शास्त्र, बालरोग शास्त्र, मज्जातंतू शास्त्र, हृदयरोग आणि श्वसनरोग शास्त्र आदी बरेच विषय यात अंतर्भूत असतात आणि या सर्व व्याधींवर कशा प्रकारे फिजिओथेरेपीने उपाय करावे, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून आणि संशोधनातून शिकविले जाते.