BMC Recruitment 2021: नोकरीची सुवर्ण संधी! BMC च्या ‘या’ विभागात मोठी भरती; १ लाखापर्यंत मिळेल पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 05:30 PM2021-12-06T17:30:08+5:302021-12-06T17:30:49+5:30
BMC Recruitment 2021: मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्या विभागात किती जागांसाठी भरती असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या...
मुंबई: कोरोनातून हळूहळू अनेकविध क्षेत्र सावरताना दिसत आहेत. यातच अनेक कंपन्यांनी पुन्हा एकदा भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. यात सरकारही मागे नाही. अनेक विभागांमध्ये नोकर भरती सुरू करण्यात येत आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेच्या एका विभागात मोठी भरती राबवण्यात येत आहे. यासाठी नोटिफिकेश जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार, अर्जाची शेवटची तारीख यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेत सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती केली जाणार आहे. या अंतर्गत ३४ विभागांमध्ये एकूण १६४ जागा भरण्यात येणार आहेत. विभागानुसार रिक्त पदांची संख्या आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये आहे.
मराठी भाषेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
या पदांसाठी इच्छुक उमेदवाराकडे नॅशनल मेडिकल कमिशन अंतर्गत शिक्षक पात्रता आणि मेडिकल इंस्टिट्यूशन रेग्युलेशन २०२१ तसेच टीईटी रेग्युलेशननुसार, शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच सुपर स्पेशालिटी डीए/एमसीएच, एमडी/एमएस, डीएनबी तसेच संबंधित विषयाचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासोबतच एमएससीआयटी आणि मराठी भाषेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवारांना १ लाखापर्यंत पगार मिळणार
ही पदभरती ३ जानेवारी ते ३० जून २०२२ या कालावधीसाठी असेल. या पदांसाठी उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच इच्छुक उमेदवारांकडून ५२५ रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ८० हजार ते १ लाखापर्यंत पगार मिळणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवांनी आपला अर्ज डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई- ४०००२२ या पत्त्यावर पाठवायचा आहे. १० डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. ही पदभरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे.