Career in Military:…इथे घडतो परिपूर्ण लष्करी अभियंता! महू येथील 'हायटेक' मिलिटरी कॉलेजचा फेरफटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 01:52 PM2024-05-23T13:52:54+5:302024-05-23T13:55:12+5:30
भारतीय लष्कराची प्रमुख तांत्रिक प्रशिक्षण संस्था असलेल्या 'एमसीटीइ'त समकालीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक प्रशिक्षण उपलब्ध आहे. 'एमसीटीइ'चे शैक्षणिक अभ्यासक्रम नामांकित विद्यापीठांशी संलग्न आहेत.
>> सुचिता देशपांडे
एखादा बदल जर करायचा असेल तर तो विद्यार्थ्यांपासून सुरू करावा आणि त्यांना मिळत असलेल्या शिक्षणातून रूजवावा, असे म्हटले जाते, हे किती सयुक्तिक आहे, याची प्रचिती मध्य प्रदेशातील महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग पाहताना येते. अद्ययावत तंत्रज्ञानासह शारीरिक व मानसिक प्रशिक्षणाअंती तिथून बाहेर पडणारा विद्यार्थी हा अभियंता तर असतोच, त्यासोबत तो एक परिपूर्ण लष्करी अधिकारी असतो.
'मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग'चे कमांडंट लेफ्ट. जनरल कुलभूषण गवस यांनी 'एमसीटीइ'तील प्रशिक्षणक्रमांची खासियत कथन केली. ते म्हणाले, “तंत्रज्ञान अत्यंत वेगाने बदलणाऱ्या आजच्या युगात, देशाच्या सुरक्षेची काळजी वाहण्यासाठी सामरिक कौशल्ये प्रामुख्याने प्रगत तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. यामुळेच 'एमसीटीइ'सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे दर्जेदार लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे महत्त्व आज विलक्षण आहे. बदलत्या तंत्रज्ञानाला अनुरूप असे बदल येथील अभ्यासक्रमांत आणि प्रशिक्षणक्रमांत वेळोवेळी केले जातात. या संस्थेतील उत्तम प्रशिक्षक आणि अद्ययावत पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक प्रगतीला हातभार लावतात आणि या विद्यार्थ्यांमधून परिपूर्ण लष्करी अभियंता घडेल, याची सर्वतोपरी काळजी 'एमसीटीइ'त घेतली जाते.”
'एमसीटीइ'विषयी...
१९४६ मध्ये 'इंडियन सिग्नल कॉर्प्स स्कूल' म्हणून सुरू झालेली आणि १९६७ मध्ये मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (एमसीटीइ) हे नाव धारण केलेली ही संस्था कालानुरूप विकसित होत गेली आहे. आज तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्णता, अव्वल दर्जा आणि कटिबद्धता याबाबत 'एमसीटीइ'ने आपला ठसा उमटवला आहे. सुरुवातीपासूनच, 'एमसीटीइ'ने बदलत्या तंत्रज्ञानासोबत आपली गती राखली आहे. १९७० च्या दशकात 'संगणक तंत्रज्ञान आणि प्रणाली' या विद्याशाखेत 'परम सुपर कॉम्प्युटर'ची स्थापना करण्यात आली होती. उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लष्करी वापराकरता आणि त्या संदर्भात प्रशिक्षण देण्याकरता- 'एमसीटीइ'ने त्यावेळीच तंत्रज्ञानाचे जे महत्त्व जाणले होते, याची प्रचिती यांतून मिळते.
भारतीय लष्कराची प्रमुख तांत्रिक प्रशिक्षण संस्था असलेल्या 'एमसीटीइ'त समकालीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक प्रशिक्षण उपलब्ध आहे. वर्षभरात तीनही सशस्त्र दलांच्या विविध विभागांतील सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेतात. त्यात कोअर ऑफ सिग्नल्स, तीनही सैन्य दलांसह सर्व शस्त्रास्त्र दले आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांतील सुरक्षा दलांचा समावेश असतो. 'एमसीटीइ' ही एकमेव अशी शैक्षणिक संस्था आहे, जी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांमधील अभियांत्रिकीची दुहेरी पदवी प्रदान करते, दोन्ही अभियांत्रिकी विद्याशाखांवर आधारित लष्करी वापराच्या दृष्टिकोनातून हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम रचलेला आहे.
येथील अभ्यासक्रमांमध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन, क्रिप्टोलॉजी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि सायबर ऑपरेशन्स या विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन या क्षेत्रांत नेतृत्व विकसित करणे हे 'एमसीटीइ'चे उद्दिष्ट आहे, जेणे करून भारतीय सैन्य दले समकालीन आणि उदयोन्मुख लष्करी मोहिमांच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनतील. याकरता कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम्स, कॉम्बॅट कम्युनिकेशन, ऑल आर्म्स विंग, सायफर विंग (कोडिंग) आणि कॅडेट प्रशिक्षण विंग यांसारख्या विविध विद्याशाखा 'एमसीटीइ'त आहेत.
'एमसीटीइ'चे शैक्षणिक अभ्यासक्रम नामांकित विद्यापीठांशी संलग्न आहेत. 'एमसीटीइ'चे पदव्युत्तर अभ्यासक्रम- देवी अहिल्या विश्व विद्यालय इंदूर, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर, पदवी अभ्यासक्रम- जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली आणि पदविका अभ्यासक्रम- राजीव गांधी प्रौद्योगिकी विद्यापीठ, भोपाळ या दर्जेदार विद्यापीठांशी संलग्न आहेत. देवी अहिल्या विद्यापीठाशी संलग्न पीएचडीसाठी संशोधन केंद्रही आहे.
कम्युनिकेशन इंजिनीयरिंग:
कम्युनिकेशन इंजिनीयरिंग ही 'एमसीटीइ'ची सर्वात मोठी विद्याशाखा आहे, जिथे दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विद्याशाखेचे पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि एमटेक अर्थात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रामुख्याने कोअर ऑफ सिग्नल्स अधिकाऱ्यांसाठी तसेच सर्व सैन्य दलांतील व मित्र देशांतील अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. या विद्याशाखेचे बहुतांश अभ्यासक्रम दीर्घ कालावधीचे असून, शस्त्रास्त्र दले तसेच तिन्ही सैन्य दलांसाठी अल्प कालावधीचे काही अभ्यासक्रमही येथे आयोजित केले जातात. स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या हुशार नॉन-कमिशन्ड अधिकाऱ्यांकरता पदविका स्तरावरील अभ्यासक्रम उपलब्ध आहे, जो पूर्ण केल्यानंतर ते त्यांच्या समकक्षांपेक्षा खूप लवकर 'ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर' बनतात आणि तांत्रिक दृष्टिकोनातून कार्यात्मक आणि अंमलबजावणी स्तरावर सिग्नल विभागात जबाबदारी सांभाळतात.
'कॉम्बॅट कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर':
कॉम्बॅट कम्युनिकेशन विद्याशाखेत 'कोअर ऑफ सिग्नल्स' विभागाचा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहे, ज्याला 'यंग ऑफिसर्स कोर्स' म्हणून ओळखले जाते. या अभ्यासक्रमात 'कोअर ऑफ सिग्नल्स'मध्ये नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केवळ लढाऊ दळणवळणाचेच प्रशिक्षण मिळते असे नाही, तर 'कोअर ऑफ सिग्नल्स'ची नैतिकता, रीतिरिवाज, परंपरा आणि युवा अधिकाऱ्यांमध्ये आवश्यक असलेले नेतृत्व गुण विकसित करण्यावर या अभ्यासक्रमात भर दिला जातो. या व्यतिरिक्त, विद्याशाखेत कंपनी कमांडर आणि रेजिमेंटल कमांडर अभ्यासक्रम सुरू आहेत, ज्याद्वारे अधिकारी अनुक्रमे विभागीय तसेच उपविभागीय (कंपनी) स्तरावर नेतृत्व करण्यास सक्षम बनतात. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर शाखेत इलेक्ट्रॉनिक युद्धासंबंधित महत्त्वपूर्ण, अनोख्या पैलूंचे आणि युद्धात त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
'कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम्स, अँड आयटी':
सर्व शस्त्रास्त्र दले तसेच तिन्ही सैन्य दलांकरता आणि मित्र राष्ट्रांतील प्रशिक्षणार्थींकरता सायबर सुरक्षा क्षेत्रातील प्रशिक्षण येथे उपलब्ध आहे. डेटा आणि माहिती आज अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याने, त्या संबंधित सूक्ष्म व अद्ययावत प्रशिक्षणाद्वारे भारतीय सैन्याची क्षमता उंचावण्याचा प्रयत्न या विद्याशाखेत केला जातो.
सायफर विंग:
लष्करात दळणवळणाबाबतची गुप्तता अत्यंत महत्त्वाची असते. सायफर विंगमध्ये सायफर आणि क्रिप्टोग्राफी हे पैलू हाताळण्यासाठी नॉन-कमिशन्ड अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते, ज्यात त्या संबंधीचा कठोर प्रक्रियात्मक भाग समाविष्ट असतो.
ऑल आर्म्स विंग:
कोणतीही समन्वित लढाई यशस्वीपणे लढता यावी, याकरता प्रत्येक लढाईचा कणा असलेल्या दळणवळणाच्या विविध पैलूंबाबत सर्व शस्त्रास्त्र शाखांतील अधिकाऱ्यांना आणि नॉन-कमिशनड अधिकाऱ्यांना 'ऑल आर्म्स विंग'मध्ये अद्ययावत प्रशिक्षण मिळते.
कॅडेट्स ट्रेनिंग विंग:
'एमसीटीइ'मधील 'कॅडेट्स ट्रेनिंग विंग'चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रशिक्षणाच्या आधीच्या प्रारूपानुसार, विद्यार्थ्याचे सुरुवातीचे वर्षभराचे प्राथमिक लष्करी प्रशिक्षण ओटीए गया येथे व्हायचे, त्यानंतर विद्यार्थी 'एमसीटीइ'च्या 'कॅडेट्स ट्रेनिंग विंग'मध्ये तीन वर्षे अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसेच लष्करी प्रशिक्षण पूर्ण करायचा. कमिशनिंगनंतर, अधिकारी म्हणून 'एमसीटीइ'च्या कम्युनिकेशन इंजिनियरिंग विद्याशाखेत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचा अभ्यास पूर्ण करायचा. मात्र, अलीकडे या प्रारूपात बदल करण्यात आले असून नव्या प्रारूपानुसार, विद्यार्थी सुरूवातीलाच थेट 'एमसीटीइ'त दाखल होऊन तीन वर्षांचे मूलभूत लष्करी प्रशिक्षण आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम एकत्रितपणे शिकतो. त्यानंतर आयएमए देहराडून येथे वर्षभराचे केवळ लष्करी प्रशिक्षण घेऊन आयएमए देहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीतून त्याचे कमिशनिंग होते आणि तो युवा अधिकारी त्याला नेमून दिलेल्या संबंधित विभागात रुजू होतो. 'कॅडेट्स ट्रेनिंग विंग'मधील प्रशिक्षणाच्या या नवीन प्रारूपामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचते आणि हे अधिकारी लष्करात लवकर दाखल होतात.
येथे घडणाऱ्या उमद्या सैनिकांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी असावे, याकरता त्याच्या सर्वांगीण विकासासाठी खास प्रयत्न केले जातात. लष्करी आणि तांत्रिक प्रशिक्षणाव्यतिरिक्त, प्रशिक्षणार्थींना वैयक्तिक आणि सांघिक खेळ खेळण्याची संधी येथे उपलब्ध असते. नौकानयन, कयाकिंगसारखे साहसी खेळ खेळण्याची उत्तम सोय येथे आहे. विविध विषयांचा परिचय होऊन विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत रूची निर्माण व्हावी याकरता पक्षी निरीक्षण, संगीत, खगोलशास्त्र, हॅम रेडिओ असे २० हून अधिक क्लब्ज येथे आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण एरो नोडल केंद्र
'एमसीटीइ'चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील आगळेवेगळे एरो नोडल केंद्र. मायक्रोलाइट फ्लाइंग आणि पॉवर्ड हँड ग्लायडर फ्लाइंग म्हणजे नेमके काय, याचे प्रशिक्षणार्थींमध्ये कुतुहल जागवणारे आणि त्यांच्यात साहसाची ठिणगी चेतवणारे असे हे केंद्र आहे. एरो नोडल केंद्राचे प्रमुख लेफ्ट. कर्नल अॅबी टीएम यांनी माहिती दिली की, २० नोव्हेंबर २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काश्मीर ते कन्याकुमारी मायक्रोलाइट उड्डाण करून या केंद्राने नवा विक्रम नोंदवला आहे. हे असे अॅडव्हेन्चर नोड आहे, ज्याचे स्वतःचे समर्पित हवाई क्षेत्र आहे. येथेही अधिकाऱ्यांसाठी अल्प कालावधीच्या विविध अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते.
अद्ययावत प्रशिक्षणक्रम
'एमसीटीइ'तील 'कॅडेट्स ट्रेनिंग विंग'चे प्रमुख कर्नल गौतम राजप यांनी येथील प्रशिक्षणक्रमांचे स्वरूप विशद केले. ते म्हणाले की, येथे शिकवल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची रचना लष्करी गरजांनुसार केलेली आहे. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक, शारीरिक, मानसिक प्रगतीकडे प्रशिक्षकांचे बारीक लक्ष असते. येथील प्रशिक्षण ड्रिल, अभ्यास, मैदानी खेळ, पोहणे, आऊटडोअर ट्रेनिंग, कॅम्प्स असे भरगच्च असते.
प्रवेश योजनेअंतर्गत बारावीनंतर थेट पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह ६० टक्के आणि जेईई मेन्स परीक्षा दिलेली असणे ही अभ्यासक्रमाची मूलभूत अर्हता आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता व मुलाखतीच्या कठोर चाचण्या पार करत विद्यार्थी येथे प्रवेश करतो. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच असल्याने मुलभूत अर्हतेचा कट ऑफ अर्थातच उंचावलेला आहे. येथे शिकणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना बारावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. आयआयटी, एनआयटी अथवा सुप्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळूनही ‘एमसीटीइ’ची निवड केलेलेही अनेक विद्यार्थी यांत आहेत. येथे प्रशिक्षणार्थींकरता प्रश्नमंजुषा, नकाशा वाचन, वादविवाद अशा स्पर्धा होतात. फुटबॉल, हॉकीसारखा एक मुख्य आणि व्हॉलीबॉल, बास्केट बॉलसारखा एक लहानसा खेळ आणि स्क्वॉश, टेनिससारखा वेगवान खेळ प्रत्येक सत्रात मुलांना शिकावा लागतो. त्यासोबतच विद्यार्थ्यांकरता इनोवेशन अर्थात नाविन्यपूर्णतेसंबंधीची स्पर्धा असते. प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांकरता फायरिंग रेंज आहे, तसेच अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटरही आहे.
येथे सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या आविष्कार, नितेश, प्रशांत श्रीवास्तव, अनघ, आदित्य या विद्यार्थ्यांचे मनोगत जाणून घेतले तेव्हा अत्यंत हुशार अशी ही मुले संस्थेतील दर्जेदार व अद्ययावत प्रशिक्षणाबद्दल, उपलब्ध सोयीसुविधांबाबत भरभरून बोलत होती. त्यांनी सांगितले, “येथील प्रशिक्षणक्रमाची काठिण्यपातळी, अत्यंत व्यग्र वेळापत्रक, कठोर नियम, शारीरिक प्रशिक्षण या सगळ्याशी जुळवून घेण्यास सुरुवातीला त्रास झाला असला, तरी इथे आल्यानंतर आमच्यात होत असलेला बदल आता आमचा आम्हांला जाणवतोय आणि आमच्यापेक्षाही, जेव्हा आम्ही सुट्टीत घरी जातो, तेव्हा हा बदल आमच्या पालकांना आणि मित्रमंडळींना जाणवतो. आम्हाला हेही जाणवते की, आमचे काही मित्र अभियांत्रिकी शिक्षण जरी घेत असले तरी शारीरिक तंदुरुस्तीकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही आणि हेच 'एमसीटीइ'चे वेगळेपण आहे. इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांत केवळ क्लासरूम अध्ययनावर भर दिला जातो, इथे मात्र शारीरिक फिटनेस, चौफेर व्यक्तिमत्त्व विकास, वादविवाद, सादरीकरण, वेगळ्या धाटणीचे प्रोजेक्ट वर्क यांवर जो भर दिला जातो, त्यामुळे वेगळ्या मुशीत आम्ही घडतो. इथे अभ्यासाचा भाग कमी असतो असे नाही, उलटपक्षी, इथे सगळेच जास्त असते. आणि हा प्रचंड वेग राखण्यासाठी वेळेचे उत्तम व्यवस्थापन आम्हां विद्यार्थ्यांना करावे लागते. इथे आम्हांला मिळणारे प्रशिक्षण हे अद्ययावत असते. एआय, क्वान्टम तंत्रज्ञान, सॅटलाइट कम्युनिकेशन यांसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा आमच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. जर तुम्हांला नवनवे शिकण्याची, त्यात अधिकाधिक उत्कृष्टता साधण्याचा आणि साहसी जीवनाचा ध्यास असेल तर ही जागा तुमची आहे.”
आज देशाच्या संरक्षणात तंत्रज्ञानाला पराकोटीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन अँड इंजिनियरिंगमधील उच्च प्रतीच्या पायाभूत सुविधा आणि दर्जेदार प्रशिक्षण यांमुळे देशाच्या संरक्षणाच्या तंत्रज्ञानाबाबतच्या सतत बदलत्या गरजांवर उपाय शोधणारा सैन्याधिकारी तयार होत आहे आणि त्यांच्याद्वारे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला जोमाने नवी पालवी फुटत आहे.
suchitaadeshpande@gmail.com