पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील करिअर; कामाच्या अनेक संधी उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:07 PM2023-08-17T12:07:42+5:302023-08-17T12:08:12+5:30

या विषय शाखेत काम करण्यासाठी अभिरुची, जिज्ञासूवृत्ती आणि विषयाची आवड असणे गरजेचे आहे.

careers in environmental science many job opportunities available | पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील करिअर; कामाच्या अनेक संधी उपलब्ध

पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील करिअर; कामाच्या अनेक संधी उपलब्ध

googlenewsNext

मागील काही वर्षांत पर्यावरण क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित होत आहे. संशोधन शाखा विस्तारत असून, जगभरात पर्यावरण क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. सजीवसृष्टी आणि पर्यावरण यांच्याशी संबंध असणारी पर्यावरण विज्ञान ही शाखा असून, पर्यावरणाचा शास्त्रीय अभ्यास आणि समस्या सोडविण्यासाठी ही शाखा कार्यरत असते. पर्यावरणातील अनेक अंतर्भूत बाबींचा आढावा यामध्ये घेतला जातो.

पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक जिवाचा पर्यावरणाशी संबंध येतोच. जीवनाला आकार देणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी पर्यावरणाचे एक नाते आहे. वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे त्याचा विकास आणि वृद्धी होत नाही. या शाखेचा मूळचा हेतू पर्यावरणातील अमूल्य पदार्थ आणि त्यांच्या विविध घटकांची सुरक्षितता हा आहे. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिक आणि तज्ज्ञांची ती प्रमुख जबाबदारी मानली जाते. पर्यावरणाच्या विकासासाठी अनेक नव्या प्रणालींचा शोध घेणे आणि मानवी विकासाचा पर्यावरणावर परिणाम होणार नाही याची काळजी या माध्यमातून घेतली जाते. आजकाल सतत पर्यावरणीय बदल दिसून येत आहेत.

या विषय शाखेत काम करण्यासाठी अभिरुची, जिज्ञासूवृत्ती आणि विषयाची आवड असणे गरजेचे आहे. अनेक सामाजिक समस्या आणि पर्यावरणाशी संबंधित अडचणी सोडविण्याची तसेच समस्येची उकल करण्याची तयारी हवी.

विद्यापीठ स्तरावर प्रयोगशाळा 

पर्यावरण विज्ञान या विषयाला सजीवसृष्टीतील प्रत्येकाशी जोडता येते. यात शारीरिक आणि जैविक विज्ञान, पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, भूगोल या सगळ्या विषयांचा  अभ्यास तसेच उपाययोजना या शाखेच्या माध्यमातून सुचविल्या जातात. पर्यावरण वैज्ञानिक होण्यासाठी बीएस्सी आणि एमएस्सी असणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे.

कामाच्या अनेक संधी उपलब्ध

पर्यावरण ही शाखा व्यापक असल्याने कामाच्या अनेक संधी  उपलब्ध होतात. कृषी क्षेत्रातही नोकरी मिळू शकते. पाणी आणि माती वैज्ञानिक म्हणूनही काम करू शकता. उद्योग, खते, खाण, रिफायनरी, वस्त्रोद्योग, सामाजिक विकास, संशोधन आणि विकास, वन्यजीव व्यवस्थापन, स्वयंसेवी संस्था, प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागरी योजना, जलसंपदा आणि कृषी, खासगी उद्योग, वन आणि पर्यावरण मंत्रालय, हवामान बदल संबंधित सरकारी संघटना पॅनेल (आयपीसीसी), संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी), भू-प्रणाली शासन प्रकल्प, दूतावास आणि पर्यावरणाशी संबंधित अन्य संस्था.

असे असते कामाचे स्वरूप

पर्यावरण वैज्ञानिक हा पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टींचा आणि तत्त्वांचा अभ्यास करतो. तो थांबविण्यासाठी संशोधन करून वैज्ञानिक मार्ग काढतो. यात हवा, पाणी, माती एकत्र करून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचाही अभ्यास केला जातो. अतिशय सूक्ष्म स्तरावर त्याचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. अनेक जर्नल्समध्येही लेखन करावे लागते किंवा आंतरराष्ट्रीय पर्यावरणासंबंधी काम करणाऱ्या समूहांसमोर सादरीकरणही करावे लागते. प्रदूषण नियंत्रण या शाखेत प्रदूषणाच्या समस्येवरही काम केले जाते. प्रदूषण रोखण्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे काम वैज्ञानिक करतात. त्यानुसार धोरण ठरविणे, सरकारला सल्ला देण्याचे काम ते करतात.

 

Web Title: careers in environmental science many job opportunities available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.