केंद्र सरकारमध्ये ९ लाख पदे रिक्त, सर्वाधिक रेल्वे आणि संरक्षणमध्ये; कधी होणार या पदांवर भरती?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 09:40 AM2023-03-30T09:40:13+5:302023-03-30T09:40:58+5:30
Govt Jobs : सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या ९.७९ लाखांहून अधिक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ९.७९ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत नोकरीसाठी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना या पदांवर नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या लाखोंच्या घरात आहे. तुम्हाला देशातील प्रत्येक शहरात अशी अनेक कोचिंग सेंटर्स सापडतील, जिथे तुम्हाला तरुण नोकरीसाठी तयारी करताना दिसतील.
आता रिक्त पदांची माहिती सरकारकडून अपेक्षित असून, त्यावरील भरतीसाठी अधिसूचनाही जारी केली जाणार आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या ९.७९ लाखांहून अधिक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. भारतीय रेल्वेत सर्वाधिक पदे रिक्त आहेत. भारतीय रेल्वेमध्ये एकूण २.९३ लाख पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे १ मार्च २०२१ पर्यंत रिक्त असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
ही रिक्त पदे भरण्याचे काम सुरू असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्था आवश्यक कर्मचाऱ्यांच्या संख्येसाठी नियुक्त्या करत आहेत. जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरात सांगितले की, सरकारने सर्व मंत्रालये/विभागांना रिक्त पदे भरण्यासाठी आधीच सूचना दिल्या आहेत. भारत सरकारकडूनही रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. रोजगार निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.
कोणत्या विभागात किती रिक्त पदे आहेत?
भारतीय रेल्वेव्यतिरिक्त रिक्त पदांच्या बाबतीत दुसरा क्रमांक संरक्षण (सिव्हिल) विभागाचा आहे. संरक्षण (सिव्हिल) मध्ये रिक्त पदांची संख्या २.६४ लाख आहे. यानंतर गृह विभागांतर्गत १.४३ लाख पदे रिक्त आहेत. यानंतर, महसूल विभागात ८०,२४३ पदे आणि इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स विभागात २५,९३४ पदे रिक्त आहेत. तर एटोमिक एनर्जी विभागात रिक्त पदांची संख्या ९,४६० आहे.
कधी होणार या पदांवर नियुक्त्या?
या पदांवरील नियुक्तीसाठी सातत्याने भरती मोहीम राबविण्यात येत असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी सातत्याने भरती सुरू आहे. वर्षभरात १० लाख रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्टही सरकारने ठेवले आहे. अशा परिस्थितीत येत्या वर्षभरात सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये भरतीसाठी सातत्याने अधिसूचना जारी होतील, अशी अपेक्षा आहे.