इयत्ता दहावी, गणित - २. मार्च २०१९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:43 AM2019-02-15T11:43:39+5:302019-02-15T11:44:49+5:30
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम बदललेला आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमातील काही भाग कमी करुन थोडा नवीन भाग वाढविलेला आहे. या अभ्यासक्रमाबरोबरच मूल्यमापन पद्धतीमध्येही बदल झालेला आहे. गणित-२ या विषयासाठी ४० गुणांची लेखी परीक्षा आणि १० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवलेले आहेत.
इयत्ता दहावी, गणित - २. मार्च २०१९
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम बदललेला आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमातील काही भाग कमी करुन थोडा नवीन भाग वाढविलेला आहे. या अभ्यासक्रमाबरोबरच मूल्यमापन पद्धतीमध्येही बदल झालेला आहे. गणित-२ या विषयासाठी ४० गुणांची लेखी परीक्षा आणि १० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवलेले आहेत.
या अंतर्गत मूल्यमापनामध्ये प्रत्येकी २० गुणांच्या दोन घटक चाचण्या होणार आहेत. त्यातील ४० पैकी ५ गुणांमध्ये रुपांतरीत केले जाणार आहेत. तसेच गणित २ साठी प्रात्यक्षिक परीक्षा ५ गुणांची असणार आहे. हे अंतर्गत मूल्यमापनाचे १० गुण शाळेकडून दिले जाणार असून ते लेखी परीक्षेच्या अगोदर दिले जाणार आहेत.
नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका कशी असेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. गणित - २ या विषयासाठी प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपातही बदल झालेला आहे.
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
प्र. १ अ) ६ पैकी ४ सोडवा (४)
ब) ३ पैकी २ सोडवा (४)
प्र. २ अ) ४ पैकी ४ सोडवा (४)
ब) ३ पैकी २ सोडवा (४)
प्र. ३ अ) ३ पैकी २ सोडवा (४)
ब) ३ पैकी २ सोडवा (४)
प्र. ४) ४ पैकी ३ सोडवा (९)
प्र. ५) २ पैकी १ सोडवा (४)
प्र्र. ६) २ पैकी १ सोडवा (३)
या प्रश्नपत्रिकेमध्ये प्र. १ अ आणि ब हा ८ गुणांचा प्रश्न इयत्ता ९वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
प्र.२ ते ६ हे प्रश्न इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावरती आधारित असतील.
प्र.२ अ हा बहुपर्यायी प्रश्न असेल.
प्र.३ अ हा कृतीवर आधारित असेल. त्यामध्ये रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचे आहे.
प्र.५ हा आव्हानात्मक प्रश्न असून त्यातील गणिते पाठ्यपुस्तकाबाहेरील असतील.
प्र. ६ हा रचनात्मक असेल.
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप पाहिल्यानंतर असे दिसून येते की, यामध्ये मागील इयत्तेतील सराव इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकातील भाग आणि अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरील गणिते अशी रचना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे योग्य प्रकारे मूल्यमापन होणार आहे.
आता या नवीन अभ्यासक्रमाचा अभ्यास कसा करावयाचा ते पाहू.
गणित - २ या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण ७ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणाची तयारी करीत असताना त्यातील महत्त्वाची सूत्रे लिहून घ्यावीत. प्रत्येक सूत्रावर आधारित २-२ गणिते वहीत लिहून घ्यावीत. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार तयारी करायची आहे.
प्रत्येक प्रकरणातील सर्व प्रकारच्या सुत्रावरील २-२ गणिते लिहून त्यांचा सराव करावा. गणित विषयात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी १ व २ गुणांच्या सोप्या सोप्या गणितांचा जास्त सराव करावा व गणितामध्ये हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील गणितांबरोबरच आव्हानात्मक गणितांचा सराव करावा.
परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका सोडवताना घ्यावयाची काळजी.
१) पहिल्या १० मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिकेचे पूर्णपणे वाचन करावे. त्यातील हमखास येणारी गणिते अगोदर सोडवून घ्यावी. ज्या गणितांना थोडा विचार करावा लागणार आहे, त्या गणितांसाठी उत्तरपत्रिकेत जागा शिल्लक ठेवून पुढच्या प्रश्नातील गणिते सोडवावीत.
२) नवीन प्रश्न नवीन पानावर सुरु करावा. प्रश्नाचा क्रमांक व उपप्रश्नांचा क्रमांक योग्य पद्धतीने लिहावा.
३) प्रत्येक गणितातील महत्त्वाच्या पायऱ्यांना पेन्सिलने चौकट करावी.
४) गणिते सोडवताना पायरी पायरीने सोडवावी.
५) आवश्यक त्या ठिकाणी एकके लिहावीत.
६) कच्चे काम उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर करावे.
७) वापरलेल्या पुरवण्यांवर पुरवणी क्रमांक लिहून त्या पुरवण्या मुख्य उत्तरपत्रिकेला क्रमाने जोडाव्या.
८) प्रमेय सोडवताना परिपूर्ण आकृती, पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता पायरी-पायरीने लिहावी. आकृतीमध्ये जी नावे दिलेली असतील तीच नावे सिद्धतेमध्ये वापरावी.
९) भौमितिक रचना करताना कच्ची आकृती आवश्यक असते. पक्की आकृती काढताना आकृतीची नावे, मापे योग्य पद्धतीने द्यावीत. आवश्यक तेथे एकरुपतेची चिन्हे काटकोनाच्या खुणा, कंसाच्या खुणा दाखवाव्यात.
१०) प्रश्नपत्रिकेत काढून दिलेल्या आकृत्या उत्तरपत्रिकेत पुन्हा काढण्याची गरज नसते.
११) चौकट दिलेली गणिते सोडवताना प्रश्नपत्रिकेतील गणित उत्तरपत्रिकेत पूर्ण लिहून चौकटीमध्ये किमती लिहाव्यात.
अशा प्रकारे गणित विषयाची चांगली तयारी करुन लेखी परीक्षेला सामोरे जावयाचे आहे. पेपरला जाताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. कोणत्याही प्रकारचे टेन्शन न घेता शांत चित्ताने पेपर लिहावा.
सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.
- राजन सुदाम कीर
सहाय्यक शिक्षक
फाटक हायस्कूल, रत्नागिरी.