सामान्य ते असामान्य, कसा होतो हा प्रवास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 05:09 PM2017-11-03T17:09:33+5:302017-11-03T17:10:16+5:30
फक्त एक गोष्ट ते नियमितपणे करतात, जे त्यांना कुठल्या कुठे घेऊन जातं..
- मयूर पठाडे
तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सामान्य आहात, मध्यम कुवतीचे आहात की असामान्य? अर्थात त्यातही अनेक प्रकार आहेत. काहींना आपल्यातली क्षमताच लक्षात येत नाही. कितीही उत्तम क्वॉलिटीज त्यांच्याकडे असल्या तरी आपण काही विशेष करीत नाही आणि आपण सर्वसामान्यच आहोत, असाच त्यांचा समज असतो, तर अनेक जणांना येत काहीच नाही, त्यांच्या क्षमताही यथातथाच असतात, पण त्याचा गवगवा मात्र ते इतका करतात, की या सम हाच! आपल्यापेक्षा मोठा दुसरा कुणी नाहीच, असंच त्यांना वाटत असतं. तिसºया कॅटेगरीचे लोक म्हणजे ते खरंच मध्यममार्गी असतात. ते स्वत:ला कमीही समजत नाहीत आणि फार भारीही नाही.
तुम्ही कुणीही असा, पण तुम्ही खरोखर काय करता, त्यावरुनच तुम्ही काय आहात हे ठरतं. तुमच्या कामावरुनच तुम्ही जज केले जाता. तुम्ही फक्त दिखावा करणारे असलात, तर तेही कधी ना कधी लक्षात येतं आणि तुम्ही उघडे पडता. पण एकदा की तुम्ही उघडे पडलात, तुमची पत गेली, लोकांनी ती ओळखली, की मग संपलं सारं.. सगळ्यांच्या लेखी तुमची किंमत शून्य होते.
त्यासाठी आपल्या कामांची प्रतवारी आपण ठरवायला हवी आणि त्या पद्धतीनंच कुठलंही काम करायला हवं, मग ते लहान असो की मोठं. पहिली गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आणि तातडीचं काम सर्वात आधी. ते अगोदरच व्हायला पाहिजे. त्याचा क्रम जर तुम्ही चुकवलात तर मग सगळंच गाडं बिघडत जातं. त्यानंतरची गोष्ट म्हणजे जे तुम्हाला पॉसिबल आहे, शक्य आहे, ते ते करा. थोड्याच कालावधीत तुम्हाला स्वत:लाच नाही, इतरांनाही लक्षात येईल, जे इम्पॉसिबल आहे, तेही तुम्ही करायला लागाल. कुणाचाही सामान्य ते मध्यम आणि असामान्य.. असा प्रवास होतो तो असाच.. अगदी कुणीही त्याला अपवाद नाही. जे जे थोर लोक आजपर्यंत होऊन गेलेत आणि ज्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत, अशा कोणाच्याही चरित्राचा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल.. त्यांनी आधी अत्यावश्यक ते केलं, मग जे त्यांना जमतं ते आणि त्यातूनच असामान्य गोष्टी घडल्या.
बघा, तुम्हालाही ते नक्की जमेल..