CoronaVirus News: ज्या कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या; तोच कोरोना आता देतोय नोकरीच्या संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:38 AM2021-04-07T00:38:19+5:302021-04-07T07:00:08+5:30
CoronaVirus Carrier opportunities: कोरोनामुळे संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलला आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडले. लॉकडाऊनच्या वर्षभराच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हजारो-लाखो बेरोजगार झाले. असे असले, तरी काही अंशी चांगलेही घडले. अनेक होतकरु तरुणांनी नव्या संधीही शोधल्या. संकटातून संधी निर्माण होऊ शकते.
- विजय सरवदे
कोरोनामुळे पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क निर्मितीसारखे स्टार्टअप उदयास आले आहेत. नवीन उद्योग सुरु झाले आणि आज ते नफ्यातही आहेत. कोरोनाचा विषाणू संपुष्टात येईल की नाही, हे आज तरी ठामपणे कोणी सांगू शकत नाही. या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘व्हायरॉलॉजी’ क्षेत्रात भरपूर संधी असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळनिर्मिती केली जाणार आहे. विद्यापीठातील ‘डीएनए बार कोडिंग सेंटर’मध्ये गेल्या वर्षी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पुढाकाराने ‘सीएसआर फंडा’तून कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली. या प्रयोगशाळेच्या उद्घाटन समारंभावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संकल्प जाहीर केला होता की, विषाणुसंबंधी सखोल अभ्यासक्रम सुरू करून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळनिर्मितीसाठी प्रयत्न केला जाईल. त्यानुसार विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ अभ्यासक्रम सुरू केला आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, देशातील हे पहिले विद्यापीठ आहे की, ज्याने सामाजिक बांधिलकी जपत दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरू केल्या. कोरोनासारखे नवनवीन विषाणू येत आहेत. त्यांचा शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. या उद्देशाने विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. यात केवळ माणसालाच नव्हे, तर प्राणी, वनस्पतींनाही बाधित करणाऱ्या विषाणुंचाही अभ्यास केला जाणार आहे.
अद्ययावत प्रयोगशाळेत प्रशिक्षण
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांना पाठविला होता. त्यांच्याकडून ‘ग्रीन’ सिग्नल मिळाल्यानंतर तो प्रस्ताव विद्या परिषदेसमोर ठेवला.
पहिली बॅच १५ विद्यार्थ्यांची असेल. विद्यापीठ परिसरात ‘डीएनए बार कोडिंग व कोरोना विषाणू चाचणी’ प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र इमारत उभारली जात आहे. त्यात अद्ययावत ‘व्हायरॉलॉजी लॅब’ उभारली जाणार असून, अभ्यासक्रम तिथेेच शिकविला जाणार आहे.
हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी, तसेच प्रात्यक्षिक, विश्लेषण, संशोधनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठातील संबंधित तज्ज्ञ प्राध्यापक, तसेच काही बाहेरच्या तज्ज्ञांना पाचरण करण्यात येणार आहे.