देखण्या दातांचे हट के करिअर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:33 PM2023-06-07T13:33:14+5:302023-06-07T13:33:38+5:30
परदेशात जाऊन करिअर करू शकता.
डेन्टल हायजिनिस्टला डेन्टिस्टला मदत करण्याचे काम करावे लागते. डेन्टिस्टला मदत करताना दातांची स्वच्छता करणे, त्याचे एक्स-रे घेणे, तसेच उपकरणे स्टेरलाइज करणे, डेन्टल क्लिनिंग, स्केलिंग, पॉलिशिंग आणि डेन्टल इम्प्रेशन अशी कामे डेन्टल हायजिनिस्टला करावी लागतात. डेन्टल हायजिनिस्ट हा रुग्णाची मेडिकल हिस्ट्री तपासतो तसेच रक्तदाब आणि अन्य गोष्टींचीही तपासणी करतो. आपल्या दातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.
दातांचे आरोग्य नीट न राखल्यामुळे दात, दाढ किडतात. या किडलेल्या दाढा काढून त्या ठिकाणी दुसऱ्या दाढा बसविणे, तसेच रूट कॅनलसारख्या शस्त्रक्रिया करून दातांचे आरोग्य कायम राखण्याचे प्रयत्न करणे, अशी कामे दंतवैद्यकाला करावी लागतात. आपल्या बिनधास्त जीवनशैलीमुळे दातांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. दातदुखी चालू झाल्यावर किंवा दाढदुखी चालू झाल्यावर अनेक जण दंतवैद्यकाचा रस्ता धरतात. जेव्हा दुखणे हाताबाहेर जाते, त्यावेळी डेन्टिस्टचा सल्ला घेण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नसतो.
डेन्टल हायजिनिस्टला डेन्टिस्टला मदत करण्याबरोबरच अनेक कामेही करावी लागतात. मुख्य म्हणजे रुग्णाबरोबर संवाद साधून त्याला दाढ काढताना वा अन्य शस्त्रक्रिया करताना वेदना जाणवणार नाहीत, याची दक्षता डेन्टल हायजिनिस्टला घ्यावी लागते. डेन्टल हायजिनिस्ट हा डेन्टिस्टबरोबर रुग्णालाही मदत करत असतो.
मागील काही वर्षांत दंतविकारांचे प्रमाण वाढले आहे, यामागे विविध कारणे आहेत. या आजारांमुळे दंतवैद्यक क्षेत्राचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होतोय. या शाखेतील वेगळ्या वाटेवरील करिअर हा तरुण पिढीसमोर नवा पर्याय आहे. दंतवैद्यकशास्त्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांना कायमच डेन्टल हायजिनिस्टचे सहकार्य लागते. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
स्वत:चा व्यवसाय करू शकता
डेन्टल हायजिनिस्ट या पदावर काम करण्याकरिता अनेक रुग्णालयांबरोबरच खासगी डॉक्टरांबरोबरही काम करता येते. नर्सिंग होम, रिसर्च डिपार्टमेंट, औषध कंपन्या येथेही काम करण्याची संधी आहे. कॉस्मॅटिक डेन्टिस्ट बनून स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतो. डेन्टल कौन्सिलिंग ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्याशी संबंधित महाविद्यालयांत अभ्यासक्रम शिकविला जातो. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे दातांच्या आरोग्याविषयी आता जागरूकता वाढतेय, येणाऱ्या काळात आपल्याकडेही या क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसेल.
कोणत्या संधी?
डेंटल हायजिनिस्टना सहसा ९ ते ५ या वेळेतील जॉब मिळतो. कामाचा दबाव आणि तणाव समान आहेत. दंत महाविद्यालयांव्यतिरिक्त खासगी दंत चिकित्सालय किंवा रुग्णालयात नोकरी मिळते. ते डेंटल सर्जरी असिस्टंट म्हणूनही काम करू शकतात. सार्वजनिक आरोग्य प्रशासनात नोकरीसाठीही अर्ज करू शकतात. ते डेंटल उत्पादनांच्या खरेदी आणि विक्रीतही करिअर करू शकतात.
किती मिळतो पगार?
फ्रेशर म्हणून डेंटल हायजिनिस्टला १५ ते २५ हजार रुपये पगार मिळतो. अनुभवाने, स्थिती आणि पैसा दोन्ही वाढू लागतात. पाश्चात्त्य देशांमध्ये हा एक प्रस्थापित व्यवसाय आहे, म्हणून भारतापेक्षा मागणी जास्त आहे. परदेशात जाऊन करिअर करू शकता.