DOT Recruitment: तुम्ही पदवीधर आहात? मुंबईत सरकारी नोकरीची संधी! दूरसंचार विभागात विविध पदांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 10:09 PM2022-09-12T22:09:39+5:302022-09-12T22:11:20+5:30
या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? पगार किती मिळू शकेल? जाणून घ्या, डिटेल्स...
DOT Recruitment: सार्वजनिक क्षेत्र असो वा खासगी क्षेत्र नोकऱ्यांच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. सरकारच्या अनेक विभागांमध्येही विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यातच आता पदवीधरांसाठी मुंबईत नोकरीची उत्तम संधी आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागात मुंबईसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून, यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन अंतर्गत सीनियर अकाउंटंट (Sr. Accountant), ज्युनियर अकाउंटंट (Jr. Accountant) आणि लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
सीनियर आणि ज्युनिअर अकाउंटंट पदाची भरती
सीनियर अकाउंटंटच्या २ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून मास्टर डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल ६ नुसार दरमहा ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. ज्युनिअर अकाऊंटंटच्या ४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून मास्टर डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल ५ नुसार दरमहा ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तसेच लोअर डिव्हिजन क्लर्कच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून मास्टर डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल २ नुसार दरमहा ६३ हजार २०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करताना रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि गोवा येथे नोकरी करावी लागणार आहे. पदाचा कालावधी ३ वर्षांचा असणार आहे.
दरम्यान, ३१ ऑक्टोबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाऊंट/ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाऊंट, बीएसएनएल बिल्डींग, तिसरा माळा, जुहू रोड, सांताक्रूझ (पश्चिम) मुंबई-४०००५४ या पत्त्यावर पाठवायचा आहे.