स्वप्न, ध्येय महत्त्वाचंच, पण तुमच्या स्वप्नांची वाट त्याहूनही अधिक महत्त्वाची..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 03:16 PM2017-11-11T15:16:53+5:302017-11-11T15:19:32+5:30
स्वप्नापर्यंत पोहोचण्याची योग्य वाट आधी शोधा आणि मग त्या दिशेनं चालत राहा.. स्वप्न तुमच्या हातात असेल..
- मयूर पठाडे
प्रत्येकाचं एक ध्येय असतं. आयुष्यात आपल्याला काय करायचंय, कुठे जायचंय, याचं स्वप्नं प्रत्येकानं पाहिलेलं असतं. अगदी प्रत्येकानंच असं ध्येय ठरवलेलं असेल असं नाही, पण अनेकांना आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे हे मनोमन पक्कं ठाऊक असतं. या स्वप्नाच्या दिशेनं त्यांचा प्रवासही सुरू असतो.
आपल्या स्वप्नाच्या दिशेनं अनेक जण पावलं टाकतात, काही अंतर चालूनही जातात, अनेक जण बरीच प्रगतीही करतात, पण किती जण आपल्या धयेयापर्यंत पोहोचतात? किती जणांचं स्वप्न पूर्ण होतं?
निरीक्षण केलं तर लक्षात येईल, अनेकांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलेलं असतं. ते पूर्ण होतच नाही. अर्ध्यातच त्यांना आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा सोडून द्यावा लागतो. आणि मग पुढे आयुष्यभर ते त्यासाठी कुढत राहातात. आपलं स्वप्न निदान दुसºयानं, निदान आपल्या मुलांनी तरी पूर्ण करावं यासाठी त्यांचा झगडा मग सुरू होतो..
पण मुलांना आपल्या आईबापाच्या स्वप्नात रस असेलच असं नाही. त्यांना त्यात रस असेल तर ठीक, पण तेही या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतील की नाही, याची काहीच गॅरन्टी नसते.
का होतं असं?..
कारण आपल्याला कुठे जायचं आहे, हे तर आपल्याला माहीत असतं, पण कसं जायचं, कुठल्या मार्गानं जायचं हेच आपल्याला महीत नसतं. रस्त्याच्या शोधातच मग आपली निम्मी किंवा त्यापेक्षाही अधिक शक्ती खर्च होते. काही वेळा या ध्येयापर्यंत जाण्याची योग्य वाट शोधण्यातच इतका वेळ जातो की नंतर खरोखरच वेळ निघून गेलेली असते.
त्यामुळे आपलं स्वप्न काय, ध्येय काय हे कितीही महत्त्वाचं असलं तरी या ध्येयापर्यंत कसं जायचं, हे त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं. आपला रस्ता, आपली वाट आधी शोधा.. आणि मग बघा.. रिझल्ट नेहमीच वेगळा आणि सकारत्मक दिसेल..