नर्सिंग क्षेत्र विस्तारतेय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 04:04 AM2018-07-10T04:04:38+5:302018-07-10T04:05:12+5:30
आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेक जण या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो.
आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेक जण या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. गरजवंतांचे संगोपन करणे, संवर्धन करणे, पोषण करणे, तसेच त्यांना शिक्षण देण्याचे कार्य जी व्यक्ती करते, तिला ‘परिचारिका’ असे ढोबळ मानाने म्हणतात. सामाजिक आरोग्यसेवा पुरविणे, माता-बाल सेवा पुरविणे, नर्सिंगसंबंधीचे प्रशासन, तसेच व्यवस्थापन विषयक कामे पाहणे, रुग्ण व नातेवाइकांना आरोग्य सल्ला देणे अशी कामे त्यांना करावी लागतात. अलीकडे समुपदेशनाचे कार्यही परिचारिका करीत आहेत. हे क्षेत्र तरुणींसाठी जास्त सुरक्षित असल्याचे मानले जाते. केरळ व इतर दक्षिणेतील तरुणींचा या क्षेत्राकडे जास्त ओढा असल्याचे दिसून येते. परदेशातही नोकरीच्या अनेक संधी आता सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. देशातही रुग्णालयांची संख्या वाढते आहे आणि उपलब्ध मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे.
नर्सिंग ही एक व्यवसायिक अभ्यासक्रमाची दिशा असून, हा एक सेवाभावी व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात रुग्णालयांची संख्या वाढली. त्यामुळे प्रशिक्षित नर्सेसची गरजही वाढली. शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांची भरती सातत्याने केली जाते. सुधारगृहे, वृद्धाश्रम, सैन्यदलाची रुग्णालये, शुश्रूषागृहे आणि परदेशातही नर्सिंग क्षेत्रात नोकरी-करिअरच्या उत्तम संधी मिळू शकतात. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडियन नर्सिंग कौन्सिल आदी ठिकाणीही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी व्यक्तिगत परिचारिकांनाही मोठी मागणी आहे.
मात्र, प्रशिक्षित परिचारिकांची गरज आणि उपलब्धता याचे आज व्यस्त प्रमाण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीच्या संधी लगेचच उपलब्ध होऊ शकतात. या क्षेत्रात पीएच.डी.सुद्धा करण्याची सुविधा काही संस्थांमध्ये आहे. असा उच्च अभ्यासक्रम केल्यावर, नर्सिंग महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून करिअर करण्याची संधी मिळू शकते.
संधी -
प्रशिक्षित, पण कमी अनुभव असलेल्या रुग्णपरिचारिकांना मासिक २० हजारांपर्यंत वेतन प्राप्ती होऊ शकते. कामाच्या पुरेशा अनुभवानंतर हीच रक्कम वाढते यात दुमत नाही. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, अरब देशांत उपलब्ध असणाºया नोकºयांत वेतनाची ही आकडेवारी आणखी जास्त असते. अनुभवी आणि कुशल रुग्णसेवक/सेविकांना परदेशात फार मोठी मागणी आहे. भारतातून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची गरज भागविली जाते. आकर्षक कमाई आणि उत्तम राहणीमान, यासाठी अनुभवी परिचारिका परदेशातील नोकरी स्वीकारण्यास उत्सुक असतात, परंतु यामुळे आपल्या देशात मात्र अनुभवी नर्सेसची नेहमी चणचण भासते. तेव्हा जर तुम्हाला दुसºयाला मदत करणे आवडत असेल, दुसºयाची सेवा करण्याचा मानवतावादी दृष्टीकोन आणि उत्तम निरीक्षण शक्ती असेल, तुमची शारीरिक व मानसिक मेहनत घेण्याची तयारी असेल, तर रुग्णसेवेतील करिअर संधी स्वीकारायला काहीच हरकत नाही.
पदवी अभ्यासक्रम
बी.एस्सी. (आॅनर्स - नर्सिंग)
बी.एस्सी. (नर्सिंग -पोस्ट सर्टिफिकेट)
जीएनएम (जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी)
एम.एस्सी (गायनेकॉलॉजी नर्सिंग)
एम.एस्सी. (पेडिअॅट्रिक नर्सिंग)
पदविका अभ्यासक्रम
हेल्थ असिस्टंट (डी.एच.ए.)
होम नर्सिंग (डी.एच.एन.)
नर्सिंग एज्युकेशन (डी.ई.ए.)
क्रिटिकल केअर नर्सिंग (पदव्युत्तर पदविका)
इमर्जन्सी नर्सिंग (पदव्युत्तर पदविका)
निओ नटाल नर्सिंग (पदव्युत्तर पदविका)
पेडिअॅट्रिक क्रिटिकल केअर (पदव्युत्तर पदविका)
प्रमाणपत्र अभ्यासक्रम
आॅक्झिलरी नर्स अँड मिडवाइफ
आयुर्वेदिक नर्सिंग
केअर वेस्ट मॅनेजमेंट
होम नर्सिंग