JOB Alert : सरकारी बँकांमध्ये 40 हजारांहून अधिक पदे रिक्त; SBI मध्ये सर्वाधिक भरती, जाणून घ्या, अधिक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:13 PM2021-12-15T12:13:56+5:302021-12-15T12:21:37+5:30
Govt Bank Job Vacancy : सरकारी बँकांमधील पदभरतीबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री ते जाणून घेऊया...
नवी दिल्ली - देशातील लाखो लोक बँकेची नोकरी (Bank Job) शोधत असतात. याच दरम्यान देशातील 12 सरकारी बँकांमध्ये तब्बल 40 हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. या बँकांमध्ये बँक अधिकारी (Bank Officer), कर्मचारी (Clerk) आणि सह कर्मचाऱ्यांच्या (Sub Staff) हजारो पदांचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)यांनीच ही माहिती लोकसभेत लेखी उत्तरांद्वारे दिली आहे. सरकारी बँकांमधील पदभरतीबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री ते जाणून घेऊया...
अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील सर्व सरकारी बँकांमध्ये एकूण 8,05,986 पदे मंजूर आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की यापैकी सुमारे 95 टक्के भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी प्राप्त आकडेवारीनुसार, 41,177 पदे अद्यापही रिक्त आहेत. यापैकी सर्वाधिक रिक्त पदे ही स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India, SBI) मध्ये आहेत.
कोणत्या बँकेत किती पदे?
एसबीआई (SBI) मध्ये तूर्त 8,544 पदे रिक्त आहेत. एसबीआयमध्ये एकूण रिक्त पदांपैकी 3,423 पदे अधिकारी पदाची आणि 5,121 पदे लिपीक स्तरावरची आहेत. पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीत (PNB) 6,743 पदे भरायची आहेत. तिसऱ्या स्थानी आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India). या बँकेत 6,295 पदे रिक्त आहेत. इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank) चौथ्या स्थानी असून या बँकेत 5,112 पदे रिक्त आहेत. बँक ऑफ इंडियात (BOI) रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या 4,848 आहे.
कोणत्या प्रकारची किती पदे रिक्त?
बँक अधिकारी (Bank Officer Vacancy) – 17,380
बँक क्लर्क (Bank Clerk Vacancy) – 13,340
सब स्टाफ – 10,457
'या' 12 बँकांमध्ये आहेत रिक्त पदे
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)
बँक ऑफ इंडिया (बीओआय)
बँक ऑफ बडोदा (बीओबी)
बँक ऑफ महाराष्ट्र
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
कॅनरा बँक
इंडियन बँक
इंडियन ओवरसीज बँक
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)
पंजाब अँड सिंध बँक
यूको बँक
यूनियन बँक ऑफ इंडिया
लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता की, या सरकारी बँकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या असलेल्या टंचाईशी सरकार अवगत आहे का? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे देशातल्या या सार्वजनिक बँका आपले काम योग्य पद्धतीने करू शकत नाही. या प्रश्नाच्या उत्तरादाखल निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एकूण स्वीकृत पदांपैकी 95 टक्के भरती झाली आहे. गेल्या 6 वर्षांपासून कोणतंही पद कमी केलेलं नाही. बँक रिक्रूटमेंट एक निरंतर प्रक्रिया आहे, जी संबंधित बँका आवश्यकतेनुसार पूर्ण करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.