वाढत्या प्रवासीसंख्येमुळे विमान उद्योगात भरतीचे जोरदार वारे; १२२२ पदे भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 06:31 AM2023-07-09T06:31:35+5:302023-07-09T06:32:50+5:30
विमानांच्या संख्येत दशकभरात किमान ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणत मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.
मुंबई : देशांतर्गत विमान प्रवासी संख्येत घसघशीत होत असलेली वाढ, विमानांची वाढती संख्या आणि देशात आगामी काळात वाढणारी विमानतळांची संख्या या पार्श्वभूमीवर विमान उद्योगाशी संबंधित सरकारी यंत्रणेत १२२२ जणांची नवी भरती केली जाणार आहे. ही भरती प्रामुख्याने नागरी विमान महासंचालनालय (डीजीसीए), एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (एएआय) आणि एअरपोर्ट्स इकोनॉमिक रेग्युलेटरी ऑथोरिटी (एईआरए) या तीन यंत्रणांमध्ये होणार आहे.
विमान प्रवासाशी निगडित या तीनही प्रमुख यंत्रणा आहेत. यांच्या माध्यमातून विमानतळाच्या पायाभूत सुविधा देखभाल, विमानतळावरील विमानांची ये जा, एअर ट्रैफिक कन्ट्रोल विमानतळाचे व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार अशा महत्त्वपूर्ण बाबी हाताळल्या जातात. आगामी काळात देशात आणखी नवीन २०० विमानतळ उभारण्यात येत आहेत. तसेच विमानांच्या संख्येत दशकभरात किमान ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणत मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.
नव्याने विकसित होणाऱ्या विमानतळांसाठी सरकारी पातळीवरूनही हालचाली सुरू झाल्या असून, ही नवी भरतीप्रक्रिया हा त्याचाच एक भाग आहे. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात त्या अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत विमान प्रवाशांच्या संख्येत तब्बल ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीमध्ये देशात व भारतातून परदेशात गेलेल्या प्रवाशांची संख्या तब्बल १३ कोटी ६० लाख इतकी आहे.