भारतीय वायुसेनेकडून अग्निवीरच्या नव्या भरतीची घोषणा, जाणून घ्या कधीपासून होणार सुरू?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 02:41 PM2022-10-13T14:41:55+5:302022-10-13T14:43:02+5:30
IAF Agniveer Recruitment 2022-2023 : भारतीय वायुसेनेने 12 ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्विट केले.
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेने नवीन अग्निवीर वायू भरतीसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच, भरतीसाठी परीक्षा जानेवारी 2023 मध्ये घेतली जाईल, अशी माहिती भारतीय वायुसेनेने ट्विट करून दिली आहे.
भारतीय वायुसेनेने 12 ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्विट केले. ज्यामध्ये लवकरच भरतीसंबंधी संपूर्ण अधिसूचना अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर प्रसिद्ध केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर वायू 2022 मध्ये भरती करण्यात आली आहे. आता 2023 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्याची नोंदणी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे.
दरम्यान, गेल्या भरतीप्रमाणे, ज्या उमेदवारांनी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजीसह 12वी किंवा तीन वर्षांच्या अभियांत्रिकी डिप्लोमामध्ये किमान 50 टक्के गुण मिळवले आहेत, त्यांना आगामी भरतीमध्ये सामील होण्याची संधी दिली जाऊ शकते. तर, विज्ञानाव्यतिरिक्त इतर विषयांसाठी 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण आणि इंग्रजीत किमान 50 टक्के गुण मिळवलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतील. याचबरोबर, मागील भरतीच्या आधारे, असेही म्हणता येईल की उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, वैद्यकीय चाचणी, शारीरिक चाचणी या आधारे केली जाईल.
महिला अग्निवीरांचाही भारतीय वायुसेनेत समावेश करणार
भारतीय वायुसेनेच्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त चंदीगडमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (Vivek Ram Chaudhary) यांनी भारतीय वायुसेनेतील (Air Force) महिला अग्निवीरांबाबत एक महत्त्वाची घोषणा केली होती. यावेळी पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांचाही समावेश करण्याचा आमचा विचार असल्याचे त्यांनी म्हटले होते. विवेक चौधरी म्हणाले होते की, 'भारतीय वायुसेनेने वायुसेना अग्निवीर योजनेंतर्गत (Air Force Agniveer) महिला उमेदवारांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षीपासून महिला अग्निवीरांना सहभागी करून घेण्याचाही आमचा विचार आहे.'