बँकांमधील ६ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 05:02 PM2024-07-22T17:02:54+5:302024-07-22T17:03:21+5:30
IBPS Clerk 2024 : यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै होती, ती आता वाढवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : आयबीपीएसने (IBPS) बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्कच्या पदासाठी अर्ज प्रक्रिया करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. या संदर्भात आयबीपीएसने आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देखील जारी केली आहे. आता उमेदवार २८ जुलै २०२४ पर्यंत आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै होती, ती आता वाढवण्यात आली आहे.
देशभरातील ११ विविध बँकांमध्ये एकूण ६,१४८ लिपिक पदांची भरती होणार आहे. या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब आणि सिंध बँक यांचा समावेश आहे.
'हे' उमेदवार अर्ज करू शकतात
अर्जदार उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा पाहिजे. उमेदवाराचे वय १ जुलै २०२४ रोजी २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराची जन्मतारीख २ जुलै १९९६ ते १ जुलै २००४ दरम्यान असावी. पात्रता आणि वयोमर्यादा संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
असा करू शकता अर्ज...
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.
- CRP Clerks वर क्लिक करा.
- यानंतर अर्ज प्रक्रियेच्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट बनवावे लागेल.
- लॉग इन करून अॅप्लिकेशन फॉर्म भरा.
- मागितलेले दस्तावेज अपलोड करून अर्ज शुल्क भरा.
- पेजला डाउनलोड करून भविष्यासाठी त्याची प्रत स्वतःजवळ ठेवावी.
कशी होईल निवड?
या पदांसाठी अर्जदारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा इत्यादी प्रक्रियेद्वारे केली जाईल. 24, 25 आणि 31 ऑगस्ट रोजी प्राथमिक परीक्षा होणार आहे. प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसतील आणि मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल. प्राथमिक परीक्षेसाठी सर्व यशस्वी नोंदणीकृत अर्जदारांना प्रवेशपत्र दिले जाईल.