IDBI Bank Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्ण संधी! १५४४ जागांसाठी बंपर भरती सुरू; ३४ हजारपर्यंत पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 09:50 AM2022-06-06T09:50:11+5:302022-06-06T09:50:57+5:30
IDBI Bank Recruitment 2022: या सरकारी बँकेने विविध राज्य, शहरांमध्ये असलेल्या शाखा आणि कार्यालयांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पाहा, डिटेल्स...
नवी दिल्ली: एकीकडे देशातील बेरोजगारीत वाढ होत असल्याचे आकडे समोर येत असताना, दुसरीकडे खासगी तसेच सरकारी क्षेत्रातील अनेकविध कंपन्या बंपर भरती प्रक्रिया राबवताना पाहायला मिळत आहेत. यातच आता नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी बँकेत नोकरीची सुवर्ण संधी आहे. या सरकारी बँकेत तब्बल १५४४ जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, कोणत्या पदांसाठी किती भरती केली जात आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? पाहा, सविस्तर तपशील...
IDBI बँकेने विविध राज्य शहरांमध्ये असलेल्या त्यांच्या विविध शाखा आणि कार्यालयांमध्ये कार्यकारी आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ३१ मे २०२२ रोजी बँकेने जारी केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार कार्यकारी पदाच्या एकूण १,०४४ आणि सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A च्या ५०० पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र, उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, कार्यकारी पदांसाठी भरती आयडीबीआय बँकेद्वारे कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रतेचे निकष कोणते?
IDBI ने जारी केलेल्या कार्यकारी आणि सहाय्यक व्यवस्थापक भरती अधिसूचनेनुसार, जे उमेदवार पदांसाठी बँकेने विहित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करतील, केवळ त्याच उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील . एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. कार्यकारी पदांसाठी उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२२ रोजी २० वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच वेळी, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी भरती अधिसूचना पाहावी, असे सांगितले जात आहे.
ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील
आयडीबीआय बँकेतील कार्यकारी किंवा सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया शुक्रवार, ३ जून २०२२ पासून सुरू होईल आणि उमेदवार १७ जून २०२२ पर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतील. उमेदवारांना अंतिम तारखेपर्यंत १००० रुपये विहित अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. तथापि, SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क फक्त २०० रुपये आहे.
दरम्यान, कार्यकारी पदांसाठी भरती एक वर्षाच्या करारावर केली जाईल, त्यानंतर कामगिरीच्या आधारावर ती आणखी वाढवली जाईल. ३ वर्षे पूर्ण झाल्यावर सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A या पदासाठी उमेदवार पात्र असतील. यासाठी पहिल्या वर्षी २९ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ३१ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी ३४ हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकेल.