महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:44 AM2020-03-03T00:44:18+5:302020-03-03T00:44:20+5:30
करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देण्याची मानसिकता शहरी - ग्रामीण मराठी विद्यार्थी व पालकांमध्ये वाढली आहे.
- प्रा. राजेंद्र चिंचोले
(स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक)
करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देण्याची मानसिकता शहरी - ग्रामीण मराठी विद्यार्थी व पालकांमध्ये वाढली आहे. स्पर्धा परीक्षेमुळे गुणवत्तेला वाव मिळवून राज्यात चांगले अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्याचे महत्त्वाचे काम महाराष्ट्र लोकसेवा आयोग करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करते. राज्यघटनेच्या ३१५व्या कलमाप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आयोगाद्वारे घेण्यात येणाºया परीक्षांद्वारे प्रत्येकाला आपली गुणवत्ता, बुद्धिमत्ता, कौशल्य, क्षमता, व्यक्तिमत्त्व दाखविण्याची संधी असते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी पदाची पूर्व परीक्षा ३ मे, २०२० रोजी होणार आहे. तर या तिन्ही पदांकरिता मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्र.१ हा ६ सप्टेंबर, २०२० रोजी घेण्यात येईल. मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी १३ सप्टेंबर, २०२०, राज्य कर निरीक्षक २७ सप्टेंबर, २०२० आणि सहायक कक्ष अधिकारी ४ आॅक्टोबर, २०२० रोजी घेण्यात येईल.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ७ जून, २०२० रोजी होणार असून, याबाबत जाहिरात एप्रिल, २०२०मध्ये प्रसिद्ध केली जाईल. या पदांकरिता मुख्य परीक्षेचा पहिला संयुक्त पेपर २९ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येईल. मुख्य परीक्षेचा लिपिक-टंकलेखक पदासाठी दुसरा पेपर ६ डिसेंबर, २०२०, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक १३ डिसेंबर, २०२०, तर कर सहायक पदासाठी २० डिसेंबर, २०२० घेण्यात येईल. राज्यसेवा परीक्षा २०२०, पूर्वपरीक्षा ५ एप्रिल, २०२० रोजी तर मुख्य परीक्षा २, ३, ४ आॅगस्ट, २०२० रोजी होईल. महाराष्ट्र कृषिसेवा परीक्षा २०२०साठी मे, २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून, पूर्वपरीक्षा ५ जुलै, २०२०, तर मुख्य परीक्षा १ आॅक्टोबर, २०२० रोजी होईल. सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२० पूर्वपरीक्षा १५ मार्च, २०२०, तर मुख्य परीक्षा १२ जुलै, २०२० रोजी घेण्यात येईल.
महाराष्ट्र वनसेवा परीक्षेसाठी मार्चमध्ये जाहिरात येईल. पूर्वपरीक्षा १० मे, २०२० व मुख्य परीक्षा ११ आॅक्टोबर, २०२० रोजी घेण्यात येईल. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च, २०२० मध्ये जाहिरात येईल. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १७ मे, २०२० रोजी होईल.
अभ्यासाचे नियोजन करताना महिन्यांचे, आठवड्याचे गणित न करता दिवसांचे व तासांचे गणित आखले पाहिजे. उपलब्ध वेळ, घटक विषयांपैकी सोपे-अवघड वा कमी सोपे-कमी अवघड वा जास्त सोपे-जास्त अवघड अशा प्रकारे विषयानुरूप वेळेची विभागणी आणि योग्य अभ्यास साहित्याची निवड या बाबींचा मेळ बसवावा लागेल. मागील दोन-तीन वर्षांपासून या अभ्यासात असलेल्या उमेदवारांना योग्य आणि उपयुक्त अभ्यास साहित्याची निवड करायला जास्त श्रम घ्यावे लागत नाहीत.
>आयोगाद्वारे घेण्यात येणाºया परीक्षा
१) राज्यसेवा परीक्षा- अतांत्रिक वर्ग-१, वर्ग-२ पदांच्या निवडीसाठी
२) पोलीस उपनिरीक्षक (अराजपत्रित गट ब) परीक्षा
३) जीएसटी निरीक्षक (अराजपत्रित गट ब) परीक्षा
४) सहायक कक्ष अधिकारी (अराजपत्रित गट ब) परीक्षा
५) कर सहायक परीक्षा गट क
६) लिपिक-टंकलेखक परीक्षा- गट क
७) दुय्यम निरीक्षक परीक्षा- गट क
८) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
९) महाराष्ट्र कृषिसेवा परीक्षा
१०) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा
११) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी परीक्षा
१२) सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा
१३) महाराष्ट्र आरोग्यसेवा परीक्षा
१४) विभागीय सहायक कक्ष अधिकारी (मर्यादित) परीक्षा
१५) पोलीस उपनिरीक्षक (मर्यादित) विभागीय परीक्षा