Post Office मध्ये नोकरीची संधी! ६५० पदांसाठी भरती; महाराष्ट्रात किती जागा भरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:46 PM2022-05-26T12:46:55+5:302022-05-26T12:48:49+5:30
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि अन्य डिटेल्स...
नवी दिल्ली: देशवासीयांचा सर्वांत विश्वासू मानल्या जाणाऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) नोकरीची मोठी संधी प्राप्त झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी शुभवार्ता आहे. कोरोना संकटातून हळूहळू सर्वच क्षेत्रे पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक असो वा खासगी क्षेत्रात नोकऱ्यांच्या अनेकविध संधी प्राप्त होताना दिसत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (India Post Payments Bank) अंतर्गत डाकसेवत पदाची भरती केली जणार आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत ग्रामीण डाकसेवक पदाच्या एकूण ६५० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी विविध राज्यातून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्रात एकूण ७२ रिक्त जागा भरण्यात येतील. पोस्ट विभाग, संचार मंत्रालयमध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. या पदांसाठी अद्याप अर्ज न केलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
अशी आहे अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी पदभरतीसाठी अर्ज करताना रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. डाकसेवक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था / बोर्डातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, जीडीएस म्हणून किमान २ वर्षे कामाचा अनुभव असावा. उमेदवाराचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३० हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे. यासाठी १० मे रोजी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, २७ मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.