दहावी नापास विद्यार्थीही परदेशात नोकरी करू शकणार, भारतीयांसाठी खुशखबर; १८ देशांमध्ये मागणी वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 10:50 AM2022-08-16T10:50:47+5:302022-08-16T10:55:18+5:30
भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग परदेशात नोकरीसाठी जात असतो. यामागची कारणं अनेक आहेत. सर्वात मोठं कारण पैसे हेच आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना परदेशात मोठी मागणी आहे
नवी दिल्ली-
भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग परदेशात नोकरीसाठी जात असतो. यामागची कारणं अनेक आहेत. सर्वात मोठं कारण पैसे हेच आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना परदेशात मोठी मागणी आहे आणि त्याचा मोबदला देखील चांगला मिळतो. यातच भारतीय कर्मचारी वर्गासाठी खुशखबर आहे. जगातील एकूण १८ देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी सातत्यानं वाढत आहे. महत्वाची बाब म्हणजे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांचीही संख्या वाढली आहे.
कोरोना काळाच्या आधी जितके भारतीय लोक परदेशात नोकरीसाठी गेलेले आता कोरोनानंतरच्या काळात त्यात दुपटीनं वाढ झाली आहे. कोरोनानंतर आता जग हळूहळू आर्थिक बाबतीत रुळावर येत असल्याची ही चिन्हं आहेत. जागतिक बाजार जसजसा उभारी घेत आहेत. तसं भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परदेशात काम करणाऱ्या भारतीयांचाही देशाला मोठा फायदा होतो, कारण त्यांनी पाठवलेल्या पैशातून सरकारला मदत होते. गेल्या वर्षी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी देशात ८७ अब्ज डॉलर्स पाठवले होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालात परदेशातून आपल्या नागरिकांनी पाठवलेल्या पैशाच्या बाबतीत भारत अव्वल स्थानी असल्याचं निष्पन्न झालं आहे.
परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या किती?
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की कोविड महामारीपूर्वी 2019 मध्ये परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या ९४ हजार होती. आता यात मोठी वाढ पाहायला मिळत आहे, कारण आता परदेशात जाणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या १.९० लाखांवर गेली आहे. १८ देशांमध्ये भारतीय कामगारांची संख्या वाढली आहे. जिथं भारतीयांना प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन चेक आवश्यक (ECR) पासपोर्ट आवश्यक आहे.