ISRO मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पगार 60000 रुपयांपेक्षा जास्त, सरकारी भत्त्यांच्या सुविधाही मिळतील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:07 AM2023-11-16T10:07:43+5:302023-11-16T10:27:53+5:30
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
नवी दिल्ली : 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. भारतीय संशोधन संस्थेने (ISRO) चालक (ड्रायव्हर) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 13 नोव्हेंबर 2023 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 18 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.
हलके वाहन चालकासाठी 9 पदे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, या भरती प्रक्रियेद्वारे अवजड वाहन चालकाच्या 9 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. दरम्यान हलके वाहन चालकाच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एसएसएलसी, एसएससी मॅट्रिकसह 10 वी पास असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांकडे वैध LVD लायसन्स असले पाहिजे. तसेच हलके वाहन चालक म्हणून तीन वर्षांचा अनुभव असला पाहिजे.
अवजड वाहन चालक पदाबद्दल बोलायचे तर या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10वी उत्तीर्ण असावेत. तसेच, त्यांच्याकडे एसएसी, एसएसएलसी पात्रता असावी. याशिवाय उमेदवारांकडे मान्यताप्राप्त HVD लायसन्स असणे आवश्यक आहे. तसेच, जड वाहन चालक म्हणून 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा. याशिवाय सार्वजनिक सेवा बिल्ला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे दरम्यान असावी. याचबरोबर, उमेदवारांची निवड प्रक्रियेबद्दल सांगायचे झाल्यास सर्वप्रथम तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल. यासोबतच उमेदवारांना वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या टप्प्यातून जावे लागेल. यानंतर या सर्व टप्प्यांची पूर्तता केल्यानंतर, उत्तीर्ण उमेदवारांची निवड केली जाईल. तसेच, उमेदवारांना 19,900 रुपये ते 63,200 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल. यासोबतच अनेक प्रकारच्या सरकारी भत्त्यांचे लाभही दिले जाणार आहेत.