IT पदवीधारकांसाठी आनंदाची बातमी; TCS आणि Infosys मध्ये होणार मेगा भरती!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 05:08 PM2022-04-30T17:08:31+5:302022-04-30T17:09:14+5:30
Infosys and TCS Jobs 2022 News : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या यावर्षी जवळपास एक लाख फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहेत.
नवी दिल्ली : तुम्ही जर आयटी क्षेत्रात (IT sector) नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी इन्फोसिस (Infosys) आणि टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेजकडून (TCS) एक आनंदाची बातमी आहे. या दोन आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या यावर्षी जवळपास एक लाख फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहेत.
रिपोर्टनुसार, नोकऱ्यांची ही संख्या आणखीही असू शकते. दरम्यान, या कंपन्यांमध्ये नोकरी सोडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कंपन्या फ्रेशर्सना नोकरीच्या संधी देत आहेत.
टीसीएस देणार इतक्या नोकऱ्या
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) चालू आर्थिक वर्षात जवळपास 40,000 फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने गेल्या वर्षीही इतक्या नोकऱ्यांचे उद्दिष्ट ठेवले होते, पण जवळपास एक लाख लोकांना रोजगार दिला होता. यंदाही ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत टीसीएसने सुमारे 35000 लोकांना नोकऱ्या देऊन विक्रम केला आहे.
किती फ्रेशर्सना इन्फोसिसमध्ये रोजगार मिळेल?
भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) देखील यावर्षी मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने 50000 आयटी फ्रेशर्सना रोजगार देण्याची योजना आखली आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या वर्षी कंपनीने 85 हजार लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या. जर तुमच्याकडेही आयटी पदवी किंवा डिप्लोमा असेल तर नोकरी मिळवण्यासाठी तयार राहू शकता.