कृषी क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या! तब्बल १.१० कोटी युवकांना दिली संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 06:29 AM2022-04-26T06:29:36+5:302022-04-26T06:29:55+5:30
इतर क्षेत्रात नोकऱ्या जात असताना कृषी क्षेत्राने दिल्या १.१० कोटी जणांना संधी
नवी दिल्ली : कोरोनामुळे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड हेलकावे खात होती आणि कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या हातातून गेल्या त्यावेळी कृषी क्षेत्राने लोकांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले. गेल्या ३ वर्षांत कृषी क्षेत्राने १.१० कोटी अतिरिक्त लोकांना नोकरीची संधी दिली असून या दरम्यान देशाच्या अन्य सर्व क्षेत्रांतील मिळून १.५० कोटींपेक्षा अधिक लोकांची नोकरी गेली होती. सीएमआयईच्या कंज्युमर पिरामिड हाऊसहोल्ड सर्वेक्षणानुसार २०२१-२२ मध्ये कृषी क्षेत्राने ४५ लाख नवे रोजगार निर्माण केले.
कृषी क्षेत्राने असा दिला अधिक रोजगार
२.१७कोटी लोक २०२०-२१ मध्ये बेरोजगार झाले. मात्र, याचवेळी कृषी क्षेत्रात ३४ लाख रोजगार वाढले. ३.३% दराने कोरोनात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली. तर अर्थव्यवस्थेमध्ये ६.३%ची घसरण झाली. ५.५% दराने २०१९-२० मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली तर इतर क्षेत्राची वाढ केवळ ३.३ टक्के दराने झाली. २५-३०% खाद्य पदार्थांच्या किमती गेल्या ३ वर्षांत वाढल्या. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला. रसायने आणि खतांमुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे सध्या नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. भारत आता गहू व तांदूळ निर्यात करणारा देश बनला आहे. अकार्यक्षम पुरवठा साखळी आणि कमी संपर्क यामुळे देशाची कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी आहे. - अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग
शेतकरी सकारात्मक
कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत शेतकरी अद्यापही आशावादी आहेत. १८.१% शेतकऱ्यांची सेंटीमेंट (भावना) मार्च २०२२ मध्ये सकारात्मक राहिली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. १६.१%एवढा प्रमुख व्यावसायिकांचा सकारात्मकतेचा निर्देशांक राहिला आहे. अहवालानुसार कोरोनात देशाच्या कृषी क्षेत्राला सर्वात कमी फटका बसला.