जास्त पगार देणाऱ्या इंजिनीअरिंगच्या ब्रँचेस कोणत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 10:37 AM2023-06-11T10:37:27+5:302023-06-11T10:39:07+5:30
इंजिनीअरिंग क्षेत्राने नेहमीच विद्यार्थ्यांना आकर्षित केलेले आहे. त्यातही सध्या जगभरात इंजिनीअरिंगच्या कोणत्या ब्रँचेस जास्तीत जास्त पगार देणाऱ्या आहेत, अशी उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. त्याची उत्तरे पाहू या...
संकलन : सुमंत अयाचित, मुख्य उपसंपादक
आर्टिफिशियल इंजिनीअरिंग आणि मशीन लर्निंग : अगदी ताज्या तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही ब्रँच एआयएमएल म्हणून ओळखली जाते व गलेलठ्ठ पगारही देते. भविष्यात अनेक ठिकाणी याच तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याने मोठी मागणी राहणार आहे. मानव आणि रोबो यांच्यातील दुवा साधण्याचे महत्त्वाचे काम या इंजिनीअर्सना करावे लागणार आहे. मानवी विचार, वर्तणूक, भावभावना यांचा यंत्राशी मेळ घालायचा आहे.
पेट्रोलियम इंजिनीअर : योग्य उमेदवारांना चांगले पॅकेज देणारी ही ब्रँच आहे. हायड्रोकार्बन, क्रूड ऑइल किंवा नैसर्गिक वायू उत्पादन करण्यावर यात भर असतो. देश-विदेशात नोकरी करण्याची यात संधी मिळते.
सॉफ्टवेअर इंजिनीअर/आयटी : डिझायनिंग, टेस्टिंग, सॉफ्टवेअर प्रोग्राम आदी काॅम्प्युटर सायन्समध्ये येते. त्यालाच सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणतात. प्रोग्राम लँग्वेज, इंजिनीअरिंगचे प्रिन्सिपल्स आणि आपले ज्ञान यांचा मेळ घालून ते सॉफ्टवेअर सोल्यूशन्स शोधतात. या ब्रँचच्या इंजिनीअर्सला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. प्रत्येक कॉलेजमध्ये याचे शिक्षण मिळते.
एअरोस्पेस इंजिनीअरिंग : मूलत: एअरोस्पेस इंजिनीअरिंग क्षेत्राचे काम म्हणजे विमाने, अंतराळयान, उपग्रह, क्षेपणास्त्र बनवणे. एरोनॉटिकल इंजिनीअरिंग आणि ॲस्ट्रॉनॉटिकल इंजिनीअरिंगचेही हेच काम आहे. त्याचप्रमाणे मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ॲव्हीऑनिक्स इंजिनीअरिंगचा फोकस एअरक्राफ्ट इंजिनीअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचवर असतो. एअरोस्पेस, मिलिट्री, स्पेसफ्लाइट, सॅटेलाइट आणि मिसाइल उद्योगांना एअरोस्पेस इंजिनीअर्सची मोठी गरज भासते.
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअर : ईसीई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इंजिनीअरिंगच्या ब्रँचमध्ये इलेक्ट्रिकल डिव्हाइसचे कन्सेप्शन, डिझाइन व टेस्टिंग येते. हे डिव्हाइसेस अनेक कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये वापरतात. ब्रॉडकास्टिंग आणि कम्युनिकेशन्स सेक्टरमध्ये या इंजिनीअर्सची नितांत गरज असते. त्याचबरोबर सॅटेलाइट, टेलिकम्युनिकेशन्स, रिसर्च, डेव्हलपमेंट, इन्फाॅर्मेशन, ब्रॉडकास्ट उद्योगातही त्यांना चांगली मागणी असते.
न्यूक्लिअर इंजिनीअर : न्यूक्लिअर एनर्जी, रेडिएशन क्षेत्रात या इंजिनीअर्सला मागणी असते. केमिकल, सायंटिफिक आणि डिफेन्समध्येही या इंजिनीअर्सची गरज भासते. न्यूक्लिअर पॉवर फॅसिलिटीमध्ये न्यूक्लिअर इंजिनीअर्सशिवाय पान हालत नाही.
याबरोबरच बिग डाटा इंजिनीअर आणि इतर इंजिनीअर्सलाही मोठी मागणी असते.