Konkan Railway मध्ये नोकरीची मोठी संधी! परीक्षेविना होणार भरती; ३५ हजारांपर्यंत पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 08:49 AM2022-05-03T08:49:10+5:302022-05-03T08:49:55+5:30
कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी असून, कुठे आणि कधी मुलाखती असतील? पाहा, डिटेल्स...
मुंबई: कोरोना संकटातून हळूहळू सर्वच क्षेत्रे पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक असो वा खासगी क्षेत्रात नोकऱ्यांच्या अनेकविध संधी प्राप्त होताना दिसत आहेत. यातच लोकप्रिय आणि यशस्वी ठरलेल्या Konkan Railway मध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेविना मुलाखतीच्या माध्यमातून कोकण रेल्वेतील पदे भरली जाणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मुलाखतीच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. एकूण १४ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. सर्व उमेदवार विहित पत्त्यावर त्यांचे अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. कोकण रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) च्या ७ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) च्या ७ पदांचा समावेश आहे.
कधी आणि कुठे होणार मुलाखती?
कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवार ११ मे आणि १३ मे, १४ मे २०२२ रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. नोंदणी फक्त मुलाखतीच्या तारखेला सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत करता येईल. या सर्व मुलाखती जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहेत. या भरतीसाठीची मुलाखत यूएसबीएलआर प्रकल्प मुख्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्स्टेंन- त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (UT) पिनकोड - १८००११ येथे होणार आहे. उमेदवारांना वेळेवर पोहोचावे लागेल आणि नियुक्त KRCL अधिकाऱ्यासोबत मुलाखतीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
अन्य महत्त्वाचा तपशील
तांत्रिक सहाय्यकाच्या या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान ६० टक्के गुणांसह संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी २५ वर्ष निश्चित करण्यात आले आहे. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना ३० हजार रुपये आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी ३५ हजार रुपये प्रति महिना वेतन मिळेल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.