पंचकर्म शिका, करिअर घडवा! देशासह परदेशातही वाढताहेत संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 07:12 PM2023-08-03T19:12:31+5:302023-08-03T19:13:59+5:30
देशासह परदेशातही आता पंचकर्म सहायकांची अतिशय कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे.
देशासह परदेशातही आता पंचकर्म सहायकांची अतिशय कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे. हे सहायक पंचकर्म तज्ज्ञांना विविध उपचार आणि क्रियांसाठी मदत करतात. ही बाब लक्षात घेऊन सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स या स्वायत्त संस्थेने पंचकर्म टेक्निशियनचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. ही संस्था केंद्रीय आयुर्वेद, योग, नेचरोपथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी (आयुष) अंतर्गत कार्यरत आहे.
पंचकर्म सहायकांची कमतरता लक्षात घेऊन केंद्र सरकारने पंचकर्म सहायक प्रमाणपत्र प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रशिक्षण पंचकर्मातील चार सेवा पुरवणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने तयार केले आहे.
प्रशिक्षण राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवा कौशल्य परिषदेशी संलग्नित आहे. या पूर्णकालीन प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. या प्रशिक्षणाचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी आहे. हे प्रशिक्षण संस्थेचे नियमित अध्यापक, पंचकर्म, कायाचिकित्सा, इतर तज्ज्ञ डॉक्टर आणि या क्षेत्रांतील नामांकित खासगी तज्ज्ञांकडून दिले जाते. शेवटच्या तीन महिन्यांत देशातील इतर पंचकर्म केंद्रांमध्ये पंचकर्माच्या प्रात्यक्षिकाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पंचकर्म तंत्रज्ञ, पंचकर्म सहायक, मसाजर म्हणून रोजगाराच्या अनेक संधी देश- विदेशातील आयुर्वेदिक संस्था, रुग्णालयांत मिळू शकतात.
अर्हता
प्रशिक्षणास कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास प्रवेश मिळू शकतो. संबंधित उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आहे.
अशी होतेय निवड
>> प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची, बारावीत मिळालेल्या गुणांवर आधारित संवर्गनिहाय (अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी इत्यादी) उमेदवारांची यादी तयार केली जाते.
>> हे प्रशिक्षण, सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली (१० जागा), नॅशनल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर पंचकर्म, चेरुथिरुती (३० जागा), सेंट्रल आयुर्वेद रिसर्च सेंटर, गुवाहाटी (१० जागा), रिजनल आयुर्वेद रिसर्च सेंटर, जम्मू (१५ जागा) या केंद्रांवर चालवले जाते.
अन्य पर्याय
१. सर्टिफिकेट कोर्स ऑन ट्रेनिंग फॉर ब्युटी केअर इन आयुर्वेद, कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण. कालावधी - १० दिवस. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश, या तत्त्वावर प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमामध्ये शरीर सौंदर्य वाढवण्यासाठी आयुर्वेदातील तंत्राचा वापर करण्याचे ज्ञान प्रदान केले जाते.
२. सर्टिफिकेट कोर्स ऑन स्टैंडर्डायझेशन ऑफ आयुर्वेदिक मेडिसिनल प्लॅट मटेरिअल- आयुर्वेद औषधींसाठी उपयोगात येणाऱ्या औषधीजन्य वनस्पती आणि त्याच्या गुणवत्ता नियंत्रणाचे या अभ्यासक्रमात दिले जाते.