Mega recruitment of Railways : रेल्वेची मेगा भरती, 90 हजार जागांसाठीच्या परीक्षेला लवकरच सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 03:50 PM2018-07-23T15:50:40+5:302018-07-23T15:51:35+5:30
रेल्वेने 90 हजार पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. रेल्वेच्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या 89,409 पदासाठी रेल्वे अर्ज मागवले होते. त्यासाठी 2.37 कोटी अर्ज आले आहेत.
मुंबई - रेल्वेने 90 हजार पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. त्यासाठी 9 ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात होत आहे. रेल्वेच्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या 89,409 पदासाठी रेल्वे अर्ज मागवले होते. त्यासाठी 2.37 कोटी अर्ज आले आहेत. या पदांसाठी तीन टप्प्यात भरतीप्रकिया पार पडेल. याबाबत Railway Recruitment Control Board च्या वेबसाईटवर 26 जुलैपासून भरतीची माहिती देण्यात येणार आहे.
रेल्वेने जाहीर केलेल्या जवळपास 90 हजार जागांपैकी पहिल्या टप्प्यात 26,502 जागा भरल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या परीक्षेसाठी 9 ऑगस्टला सुरुवात होत आहे. मात्र, परीक्षेचे ई-कॉल लेटर 5 ऑगस्टपासून परीक्षार्थींना डाऊनलोड करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 26 जुलैपासून संबंधित परीक्षेची माहिती मिळविण्यासाठी रेल्वेच्या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. 26 जुलैपासून परीक्षेसंदर्भातील सर्वच माहिती या साईटवर वेळोवेळी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
परीक्षेचे स्वरुप -
रेल्वेची ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यासाठी परीक्षार्थींना 60 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. तर दिव्यांगांना 20 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
परीक्षेत चार पर्याय असलेले एकूण 75 प्रश्न विचारले जातील. पण, चुकीचे उत्तर दिल्यास एक तृतीयंश गुण वजा होणार आहेत. त्यामुळे परीक्षार्थींनी काळजी घेणे आवश्यक आहे.
अॅडमीट कार्ड -
परीक्षार्थींना रेल्वे रिक्र्युटमेंट बोर्डाच्या वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध होईल. त्यानंतर rrbcd.gov.in या वेबसाईटवरुन तुमचे अॅडमीट कार्ड तुम्हाला घेता येईल.