MPSC Recruitment Update: एमपीएससीकडून राज्य सेवेच्या ६७३ पदांची भरती; पूर्व परीक्षेसाठी २२ मार्चपर्यंत भरता येणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 07:12 AM2023-02-26T07:12:54+5:302023-02-26T07:13:04+5:30
सामान्य प्रशासन विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग या विभागातील ६७३ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा जाहीर करण्यात आली असून त्यानुसार या परीक्षेद्वारे पाच विभागातील ६७३ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पूर्व परीक्षा ४ जून रोजी ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
सामान्य प्रशासन विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग या विभागातील ६७३ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येईल. त्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा ७ ते ९ ऑक्टोबर, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबर, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट ब मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबरला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंबंधीची सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी २ ते २२ मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येईल. चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी २८ मार्च ही अंतिम मुदत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. परीक्षेबाबतच्या सविस्तर सूचना एमपीएससीच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.
कोणत्या संवर्गासाठी किती पदे ?
यामध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये २९५ पदे, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात १३० पदे, सार्वजनिक बांधकाम विभागात १५ पदे, अन्न व नागरी विभागात ३९ पदे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात १९४ पदांकरिता परीक्षा होणार आहे.