केंद्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी; MyGov मध्ये इंटर्नची भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 05:08 PM2021-11-09T17:08:24+5:302021-11-09T19:07:53+5:30
केंद्र सरकारनं My Gov च्या माध्यमातून मंत्रालयाची जनहित धोरणं, लोकांचा प्रतिसाद आणि सरकारच्या विविध कार्यक्रमात लोकांचा सहभाग करुन घेण्यासाठी हे व्यासपीठ आणलं आहे.
नवी दिल्ली – जर तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटर्नशिप करण्याची प्रतिक्षा करत असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकार संधी घेऊन आलं आहे. My Gov च्या सिटिजन एगेंजमेंट प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काम करण्याची संधी आहे. केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेतंर्गत विविध मंत्रालय आणि खात्यांमध्ये तुम्हाला काम करता येऊ शकतं. सरकारने युवकांना केंद्रस्थानी ठेऊन ही योजना सुरु केली आहे.
केंद्र सरकारनं My Gov च्या माध्यमातून मंत्रालयाची जनहित धोरणं, लोकांचा प्रतिसाद आणि सरकारच्या विविध कार्यक्रमात लोकांचा सहभाग करुन घेण्यासाठी हे व्यासपीठ आणलं आहे. My Gov हे एकमेव व्यासपीठ आहे ज्याठिकाणी कोविड काळात विश्वासार्ह माहिती. ताज्या आणि अधिकृत घडामोडी उपलब्ध होत होत्या. My Gov तुम्हाला सरकारसोबत काम करण्याची संधी देत आहे.
MyGov इंटर्नच्या शोधात
भूमिका आणि जबाबदारी – हा इंटर्नशिप कार्यक्रम पूर्ण वेळेसाठी असून त्यात सरकारी धोरणांबाबत, व्यवस्थापन यावर जागतिक प्रशिक्षणाचा अनुभव युवकांना घेता येईल. जर तुम्ही सध्या शिकत असाल किंवा नुकतेच पदवीचं शिक्षण घेतलं असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे.
व्यवस्थापन टीमचा भाग बनून तुम्हाला MyGov कडून धोरणात्मक पॉलिसी लोकांपर्यंत पोहचवणे. सोशल मीडिया, रिसर्च, क्रिएटीव्ह टीममध्ये तुम्हाला काम करता येईल. उत्तम लिखाण कौशल्य, सोशल मीडियाची माहिती असणे गरजेचे आहे.
ग्राफिक्स डिझाईन, लोगो, बॅनर्स वेबसाईट आणि सोशल मीडियासाठी बनवणं. तसेच MyGov ची तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी आयटी, सॉफ्टवेअरची माहिती असणाऱ्या युवकांची गरज आहे. इंटर्नशिप करण्यासाठी तुमच्याकडे संवाद आणि लिखाण कौशल्य हवं. सोशल मीडिया, संगणक याबद्दल माहिती असावी.
२ महिन्यासाठी ही इंटर्नशिप असेल, उमेदवाराचं काम बघून ती पुढे वाढवता येऊ शकते. ज्या विभागात काम करणार आहे त्याठिकाणची वेळ पाळणे बंधनकारक आहे. या कामासाठी कुठलाही आर्थिक मोबदला दिला जाणार नाही. तर इंटर्नशिप केल्याचं प्रमाणपत्र देण्यात येईल.
काय आहे MyGov?
MyGov हे केंद्र सरकारचं सार्वजनिक व्यासपीठ आहे. ज्याठिकाणी सरकार आणि विविध खात्याकडून चालवण्यात येत असलेल्या योजनांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम करते. सोशल मीडिया आणि ऑफलाईन माध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार केला जातो. त्याशिवाय लोकांचा प्रतिसाद आणि सरकारी कार्यक्रमात त्यांचा सहभाग करुन घेण्यासाठी MyGov काम करतं.