एक नूर आदमी, दस नूर कपडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 02:21 PM2023-04-16T14:21:25+5:302023-04-16T14:21:53+5:30
कोणतेही करिअर असो, नोकरी असो, व्यवसाय असो त्यात आपण परिधान करीत असलेल्या कपड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही मुलाखतीला आपण जातो, तेव्हा आपल्या दिसण्यावरून अनेक गोष्टी ठरत असतात.
स्वच्छ आणि फ्रेश
आजकाल सर्वचजण स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले कपडे घालतात. तरीही जे असे करीत नाहीत, त्यांनी याकडे बारकाईने पाहिले पाहिजे. आपले करिअर, नोकरी कोणत्या प्रकारचे आहे, ते पाहून त्याला साजेसा लूक असावा. कोठे फॉर्मल वापरायचे, कोठे टी-शर्ट, कोठे फ्लिप-फ्लॉप वापरायचे याचे भान बाळगावे.
रंग कोणता?
आपण घालणार असलेल्या कपड्यांचा रंग कोणता असावा, यालाही फार महत्त्व आहे. आपले व्यक्तिमत्त्व कोणत्या रंगात खुलून दिसते, हे वेळोवेळी तपासावे किंवा हितचिंतकांना विचारावे आणि त्यानंतर त्याबाबत निर्णय घ्यावा. कुठे मॅचिंग, कुठे प्रिंटेड आणि कुठे प्लेन कपडे घालायचे, याचाही निर्णय घ्या. व्यावसायिक आघाडीवर भडक, चमकदार कपडे घालणे योग्य समजले जात नाही. काही विशिष्ट रंगांचे कपडे घालणे म्हणजे ते विशेष संकेत समजले जातात. तेही लक्षात घ्यावे. एवढेच नव्हे, तर पँट आणि मोज्यांचा रंग मॅचिंग असावा, असे अलिखित संकेत आहेत.
घट्ट की सैल?
कपडे घट्ट घालावेत की सैल, हाही महत्त्वाचा मुद्दा समजला जातो. आपल्या शरीराला साजेसे कपडे असावेत. फार सैलही नको आणि फार घट्टही नको. अगदी योग्य आकाराचे अपडे असावेत. फिटिंग योग्य नसलेले कपडे आपली प्रतिमा बिघडवू शकतात; तसेच समोरच्या व्यक्तीचे लक्षही विचलित करू शकतात.
कपडे कोणते?
चांगले कपडे म्हणजे महाग कपडे असे अजिबात नव्हे. कॉटन किंवा पॉलिस्टर मिक्स असलेले फॅब्रिकही उत्तम आहेत. ते परवडणारेही आहेत आणि कमी किमतीत ऑनलाइन खरेदी करता येतात.
सिझन महत्त्वाचा
कोणत्या सिझनमध्ये कोणते कपडे घालायचे, यालाही फार महत्त्व आहे. त्याचबरोबर कोणत्या कार्यालयात, कामाची वेळ कोणती आहे, हेही ध्यानात घ्यावे लागते. एकंदरीत कोठे फॉर्मल कपडे घालायचे आणि कोठे नाही, हे प्रत्येकाला तारतम्याने ठरवावे लागेल. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सूट, बूट, टाय अपेक्षित आहे. जाहिरात, आयटी कंपन्यांत तर कोणते कपडे चालतात, हे आपणा सर्वांना माहिती आहे.
चला तर मग आपल्या कपड्यांबाबत अधिक सजग होऊन आपले व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसण्यासाठी विशेष प्रयत्न करूया.
संकलन : सुमंत अयाचित, मुख्य उपसंपादक