अंतराळ क्षेत्रातल्या संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 07:54 AM2018-04-05T07:54:52+5:302018-04-05T07:54:52+5:30
आकाश कवेत घेण्याचा ध्यास, क्षमता आणि जिद्द हवी, ती असेल तर अवकाश संशोधन क्षेत्रात आता नव्या संधींची कवाडं उघडत आहेत..
अंतराळात जाणं, या क्षेत्रात करिअर करणं, ग्रह-ताऱ्यांचा वेध घेणं, एअरक्राफ्ट किंवा स्पेसक्राफ्ट बनवणं हे सारे सामान्य माणसांच्या कुतूहलाचे विषय असतातच. मात्र या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणं, त्यात करिअर करणं हा विचार मनात आला की अनेक विद्यार्थी विचार करतात की, हे मला जमणार नाही. हा विषय माझ्या बुद्धिमत्तेच्या कक्षेतच नाही. मात्र असा विचार न करता आपल्या क्षमता ओळखून, आपली कष्ट करण्याची तयारी, आपल्याला या विषयात असलेली रुची आणि कल समजून घेऊन जर योग्य माहिती मिळवली, तर आता या नव्या जगातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. आपण योग्य माहिती मिळवून त्या दिशेनं योग्य प्रयत्न करणं मात्र अपेक्षित आहे.
आपण छोट्या शहरात राहतो, खेड्यात राहतो, अमुक माध्यमात शिकलो असे गंड मनात न ठेवता योग्य माहिती, योग्य दिशा आणि खरोखरच आपल्यात असलेल्या क्षमता ओळखून मात्र वाटचाल करत राहिली पाहिजे.
त्यादृष्टीनं या क्षेत्रातली करिअरसंधी आणि शिक्षण, अभ्यासक्रम यांचीही माहिती करून घेतली पाहिजे. त्यातल्याच काही अभ्यासक्रमांवर ही एक नजर.
एरोस्पेस इंजिनिअरिंग
अन्य सर्व इंजिनिअरिंग क्षेत्रासारखं अंतराळ क्षेत्रातल्या कामासंदर्भातलं हे एक प्राथमिक शिक्षण. या एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एअरक्राफ्ट आणि स्पेसक्राफ्ट (रॉकेट्स) डिझाइन करण्याचं, बनवण्याचं तंत्र शिकवलं जातं. त्यातही मुख्यत्वे दोन शाखा आहेत.
एक म्हणजे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि अॅस्ट्रॉनॉटिकल इंजिनिअरिंंग.
या एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये काय शिकवतात, तर रॉकेट्सचा आराखडा (डिझाइन) तयार करणं, त्यासंदर्भातलं संशोधन (रिसर्च) आणि डेव्हलपमेंट ( त्यातले बदल आणि प्रगतीपर टप्पे). हे सारं स्पेस व्हेईकल, त्यातल्या सिस्टिम्स, वातावरण आणि अंतराळातलं वातावरण या साºयाचा अभ्यास यात करावा लागतो.
अर्थात, इंजिनिअरिंगचं तर स्किल उत्तम हवंच, मात्र उत्तम संवादकौशल्यही यासाठी आवश्यक असतं. ते असेल तर मग एरोस्पेस इंजिनिअरिंग केल्यानंतर नासा, इएसए आणि इस्रो यासारख्या उत्तम संस्थांमध्येही काम करण्याची संधी मिळू शकते. या कामात अनेक उत्तमोत्तम संधी तर आहेतच, मात्र उत्तम पैसा आणि अत्यंत समाधानही आहे. कष्ट आणि अभ्यास यांना मात्र पर्याय नाही.
पात्रता काय?
तुम्हाला एरोस्पेस अर्थात अंतराळ क्षेत्रात शास्त्रज्ञ किंवा इंजिनिअर म्हणून करिअर करायचं असल्यास बारावीनंतर किमान चार ते सात वर्षांचं शिक्षण हवं. विज्ञान किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातली किमान पदवी हवीच. काही महाविद्यालये पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रमही शिकवतात. त्याचाही उपयोग होतोच.
या क्षेत्रात शिरकाव करायचा तर हातात इंजिनिअरिंगची पदवी हवी, गणितज्ज्ञ, फिजिकल सायंटिस्ट, लाइफ सायंटिस्ट म्हणून काम करायचं, तर विज्ञान क्षेत्रातली पदवी हवी. अर्थात उच्चशिक्षण अधिक महत्त्वाचं. पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी. असेल तर अंतराळ अभ्यास, सौर ऊर्जा आणि त्यापलीकडचं जग, एलिअन्स या साºयाचाही अभ्यास करण्याची संधी मिळू शकते.
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस, सिव्हिल, प्रॉडक्शन आणि मेकॅनिकल आणि अन्य इंजिनिअर्सना यात संधी मिळू शकते. याशिवाय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, मिटरॉलॉजी, गणित, प्रायोगिक जीवशास्त्र या विषयांतली पदवीही शिरकाव करण्यासाठी आवश्यक ठरतात.
याशिवाय अंतराळ विज्ञान विषयातही काही अभ्यासक्रम असतात.
पीएच.डी. ( अॅरॉनॉटिक्स/स्पेस इंजिनिअरिंग), पीएच.डी. (अॅस्ट्रॉनॉमी-अॅस्ट्रो बायॉलॉजी), एम.एस. (इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी, फ्रान्स), एम.एस. (अमेरिका आणि अन्य युरोपीय देश), एम.टेक. (स्पेस टेक्नॉलॉजी)-इस्रोच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्पेस टेक्नॉलॉजी, एम.ई.-सॅटेलाइट इंजिनिअरिंग, बी.टेक.-एरॉनॉटिक्स यासह सर्व शाखांचे बी.ई., एम.ई., एम.टेक., बी.सी.एस., एम.सी.एम.
संधी काय?
या क्षेत्रात फक्त अंतराळ विज्ञानात संधी आहे असं नव्हे, तर अन्य कामांतही, अवकाश उड्डाण क्षेत्रातही करिअरसंधी आहेत.
* एअरक्राफ्ट डिझाइन अॅण्ड सिस्टिम्स, मॅन्युफॅक्चरिंग
* एअरक्राफ्ट मेंटेनन्स (विमानतळावर)
* डिझाइन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर आॅफ एअरपोर्ट
* एच.ए.एल., डी.जी.सी.ए., इंडियन एअर फोर्स
*कॉम्बॅट एअरक्राफ्ट/फायटर प्लेन्स
*एरोस्पेस कंपनी- बोइंग, एअरबस इत्यादी
* पर्यटन
इस्रोतही विविध संधी
* विविध उपकरणे पुरवणं, रॉकेट्सचे विविध पार्ट्स, क्रायोजेनिक इंजिन यासह इस्रोत विविध विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी इस्रोच्या परीक्षा असतात. अधिक माहिती त्यांच्या वेबसाइटवर मिळू शकते.
- लीना बोकील
( नासाच्या हनीवेल स्पेस एज्युकेटर)
लीना बोकील या विज्ञान प्रसारक आणि नासाच्या हनीवेल स्पेस एज्युकेटर आहेत. आजवर त्यांनी पाचवेळा नासाला भेट दिलेली आहे. त्या इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर आहेत. टेलिकॉम मॅनेजमेंट विषयात त्या पीएच.डी. आहेत. यूफॉलॉजी या विषयात संशोधन करत आहेत. नील आर्मस्ट्रॉँग, बझ अॅल्ड्रीन्स सारख्या चंद्रावर पाऊल ठेवणाºया अंतराळवीरांना त्या भेटलेल्या आहेत. भारतीय अंतराळवीर राकेश शर्माची भेटही यादगार असल्याचं त्या सांगतात. त्यांचे वडील श्रीकांत कुलकर्णी हे त्यांचे मार्गदर्शक. त्यांनी लेकीला मोठी स्वप्न पहायला शिकवलं. सांगलीला त्यांचं शिक्षण झालं, मूळच्या त्या बेळगावच्या. तिथून हा प्रवास त्यांचा अंतराळाच्या ध्यासाचा पाठलागच आहे. डॉ. गोवारीकर यांचंही त्यांना मार्गदर्शन लाभलं. आता अंतराळ क्षेत्रात करिअर करणाºया तरुण मुलांना त्या मार्गदर्शन करतात.
lsbokil@gmail.com