तरुणांनो, सैन्यातील भरतीसाठी तयारीला लागा; शेकडो जागा भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 07:32 AM2023-05-31T07:32:37+5:302023-05-31T07:32:56+5:30
संयुक्त संरक्षण सेवा लेखी परीक्षा ३ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. या
जुलै २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी ३४९ पदांच्या भरतीसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ६ जून २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. संयुक्त संरक्षण सेवा लेखी परीक्षा ३ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. यात लष्कर प्रबोधिनीसाठी १०० पदे, नौदल प्रबोधिनीसाठी ३२ पदे, हवाई दल प्रबोधिनीसाठी ३२ पदे, ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी पुरुषांसाठी १६९ पदे व ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी महिलांसाठी १६ पदे, अशा एकूण ३४९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. भारतीय सैन्य दलात बारावीनंतर अधिकारी होण्याची संधी हुकल्यास निराश होण्याची गरज नाही. सैन्यात अधिकारी होण्याची आणखी एक संधी पदवीनंतर संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा होते. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीडीएस ही परीक्षा पुरुष व महिला दोन्ही देऊ शकतात. महिलांना लष्करात अधिकारी होण्याची संधी सीडीएस मार्फतच उपलब्ध होते. यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून भरावा लागतो.
परीक्षा ही वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरूपाची आहे. भारतीय लष्करी प्रबोधिनी अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी, नौदल प्रबोधिनी, हवाई दल प्रबोधिनी आदींचा प्राधान्यक्रम द्यावा लागतो. सीडीएस परीक्षेसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – १) इंडियन मिलिट्री अकादमी (भारतीय लष्करी प्रबोधिनी) साठी १९ ते २४ वर्ष २) नवाल अकादमी (नौदल प्रबोधिनी) साठी १९ ते २४ वर्षे, ३) हवाई दल प्रबोधिनीसाठी २० ते २४ वर्षे, ४) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी) साठी १९ ते २५ वर्षे. सीडीएस परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता ही सेवानिहाय वेगळी असून, भारतीय लष्करी प्रबोधिनीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, नौदल प्रबोधिनीसाठी बी.ई /बी.टेक व हवाईदल प्रबोधिनीसाठी भौतिकशास्त्र, गणित विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. लेखी परीक्षा, व्यक्तिमत्त्व चाचणी, मुलाखत व वैद्यकीय चाचणी यातून उमेदवारांची निवड होते.
अशी हाेते नियुक्ती
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करात लेफ्टनंटपदी निवड होते. लेफ्टनंटनंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध आहेत.
हवाई दलाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती होते. नंतर फ्लाइंग लेफ्टनंट, स्क्वॉट्रन लिडर, विंग कमांडर पदोन्नतीच्या संधी आहेत. नौदलाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सब लेफ्टनंट पदावर निवड होते. त्यानंतर लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर, कमांडर, कॅप्टन या पदोन्नतीच्या संधी आहेत. तरुणांंना यातून देशसेवा करण्याचे भाग्य मिळते.
प्रा. राजेंद्र चिंचाेले
(स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक)