बारावी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; 9500 जागांसाठी भरती, असा करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 05:46 PM2022-10-14T17:46:20+5:302022-10-14T17:46:51+5:30
Railway Recruitment : लेखी चाचणी, कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) च्या 9500 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी 12 वी पास ते पदवीधर उमेदवार rpf.indianrailways.gov.in या रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यामध्ये लेखी चाचणी, कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, रोजगार कार्यालय नोंदणी प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्रे आहेत. अर्ज करण्यासाठी, उमेदवार कॉन्स्टेबल पदासाठी 12वी पास आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, या रेल्वे भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असावी. उमेदवारांची निवड कागदपत्रे पडताळणी, लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. तसेच या भरतीसाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
याठिकाणीही उमेदवारांना नोकरीची मोठी संधी
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीने (Sardar Vallabhbhai Patel National Police Academy) एक भरती अधिसूचना जारी केली आहे. ज्यानुसार सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये अनेक पदांची भरती केली जाणार आहे. या भरती मोहिमेमध्ये आउटसोर्सिंग आधारावर सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, फोटोग्राफिक ऑफिसर, कनिष्ठ अनुवादक, सहाय्यक (मिनिस्ट्रियल) इत्यादी पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना तपासू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदानुसार इंटरमीडिएट, पीजी, डिप्लोमा, बीएससी, बीटेक किंवा संबंधित स्पेशलायझेशनमधील समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण झाले पाहिजे. याशिवाय उमेदवाराला संबंधित कामाचाही अनुभव असला पाहिजे.
असा करावा लागेल अर्ज
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट www.svpnpa.gov.in वर जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना तो संबंधित कागदपत्रांसह सहाय्यक संचालक, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, शिवरामपल्ली, राघवेंद्र नगर, हैदराबाद, तेलंगणा 500052 येथे पाठवावा लागेल.