'पोस्ट कोविड' जगात नोकरी मिळवण्यासाठी/टिकवण्यासाठी हवं रिट्रेनिंग, रिस्किलिंग; जाणून घ्या नेमकं काय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 05:01 PM2021-05-22T17:01:02+5:302021-05-22T17:07:24+5:30

आत्मनिर्भर करिअर असं म्हंटलं तर जरा विचित्रच वाटेल. नोकऱ्या जात आहेत, नव्या संधी नाहीत तर कसं ‘आत्मनिर्भर’ होणार? त्यावर उत्तर हेच की, जगभरात आता रिट्रेन होण्याची, नवे कौशल्य शिकण्याची गरज सांगितली जातेय. पण म्हणजे नेमकं करायचं काय?

Retraining, reskilling is important to get retain a job in the 'post covid' world | 'पोस्ट कोविड' जगात नोकरी मिळवण्यासाठी/टिकवण्यासाठी हवं रिट्रेनिंग, रिस्किलिंग; जाणून घ्या नेमकं काय!

'पोस्ट कोविड' जगात नोकरी मिळवण्यासाठी/टिकवण्यासाठी हवं रिट्रेनिंग, रिस्किलिंग; जाणून घ्या नेमकं काय!

googlenewsNext
ठळक मुद्दे२०२५ मध्ये नोकरी मिळवणे व टिकवणे यात सगळ्यात महत्त्वाचे दुसरे कौशल्य असेल - स्वयंअध्ययन.सहपदवी-सहपदविका मिळवणे म्हणजे आपल्या करिअरचा ऑक्सिजन असेल. इंडस्ट्री ४.० मधील तंत्रज्ञानाचा वेग, ऑटोमेशन आणि कोविड १९ नंतरचे जग यात ३६ टक्के लोकांनी काम, नोकरी गमावल्याने आता विद्यार्थी जागे होत आहेत.

- डॉ. भूषण केळकर

मार्चमध्ये बातमी होती की दहावी-बारावीच्या दीड लाख मुलांच्या सर्वेक्षणात असं आढळलं की बहुतांश विद्यार्थ्यांनी फक्त ५० टक्के अभ्यासक्रमाचाच अभ्यास केला आहे. ३३ टक्के विद्यार्थी ड्रॉप घेण्याचा विचार करत आहेत. आता त्यानंतर परीक्षाच रद्द झाल्या ही गोष्ट सोडा. पण त्या सर्वेक्षणात असंही म्हंटलं आहे की स्वयंअध्ययन अर्थात सेल्फ स्टडी म्हणून केवळ एक टक्काच मुलांनी आपला सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला होता. माझ्या मते हाच खरा कळीचा मुद्दा आहे. केवळ दहावी बारावीच नव्हे तर सर्वच विद्यार्थांना तरुण-तरुणींना हा मुद्दा लागू होतो.

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या २०२० च्या फ्युचर ऑफ जॉब्ज रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की २०२५ मध्ये नोकरी मिळवणे व टिकवणे यात सगळ्यात महत्त्वाचे दुसरे कौशल्य असेल - स्वयंअध्ययन.

करिअर कौन्सिलिंग करतानाचा अनुभव सांगतो, परवाच एक उद्योजक मला म्हणाला की त्याच्याकडील मागील वर्षीच्या २५० लोकांपैकी केवळ ६८ लोक अजून कामावर आहेत. आणि ही लोक अशी आहेत ज्यांच्याकडे काही पूरक कौशल्य होती किंवा ती शिकण्याची त्यांनी तयारी दर्शवली.

मला वाटतं की स्वयंअध्ययन करून पूरक कौशल्य आपण आतापासूनच मिळवणे. सहपदवी-सहपदविका मिळवणे म्हणजे आपल्या करिअरचा ऑक्सिजन असेल. आपले करिअर कधीच व्हेंटिलेटरवर न जाण्यासाठी हा ऑक्सिजनच फार उपयोगी ठरणार आहे.

एप्रिल २०२१ चा बीसीजीचा १९० देशांतील दोन लाख लोकांचा (मुख्यत: तरुण) सर्वेक्षण असं सांगतं की इंडस्ट्री ४.० मधील तंत्रज्ञानाचा वेग, ऑटोमेशन आणि कोविड १९ नंतरचे जग यात ३६ टक्के लोकांनी काम, नोकरी गमावल्याने आता विद्यार्थी जागे होत आहेत. २/३ लोकांना आता हे पटले आहे की आपल्याला रिट्रेन व्हावे लागेल. विशेषतः प्रवास, माध्यमे, कला, सेवाक्षेत्र, ग्राहक सेवा या क्षेत्रात धोका आहे. त्यामानाने आयटी, तंत्रज्ञान, शास्त्र, संशोधन व मनुष्यबळ क्षेत्रात फटका कमी आहे. पण तरीही रिट्रेनिंगची गरज सार्वजनिक आहे.

मला हा बीसीजी रिपोर्ट संपूर्ण वाचताना गंमत अशी वाटली की या कोविड १९ नंतरचे जग, व इंडस्ट्री ४.० नंतरचे जग हे नोकऱ्यांना धोकादायक असेल याची जाणीव व काळजी ही भारतीयांना जगात इतरांना आहे, तेवढीच आहे सर्वसाधारण ॲव्हरेज. परंतु नोकऱ्यांसाठीचे रिट्रेनिंग करणं याबद्दलची तयारी यात जगाचं ॲव्हरेज आहे ६८ आणि भारतीयाचं आहे ५८.

मला असं वाटतं की रिट्रेनिंगची, रिस्किलिंगची आपली तयारीही असू शकेल पण म्हणजे नेमकं करायचं काय हे अनेकांना कळत नाही.

तर म्हणजे नेमकं करायचं काय?

१. उदाहरण सांगतो, एआयचा वापर करुन मी स्वत: च एक ॲप बनवलं करिअर क्लॉक नावाचं. ते विनामूल्य उपलब्ध आहे प्ले स्टोअरवर. त्यात जाऊन प्रश्नावली भरली, तर करिअर पूरक १२ महत्त्वाचे मुद्दे समजतात. ते तुम्हाला ओळखणाऱ्या पाच जणांना पाठवा, त्याला ३६० फिडबॅक म्हणतात. त्यातून तुम्हाला रिपोर्ट मिळेल की तुमची बलस्थानं कोणीत, कमकुवत काय, कुठे कमी पडता. हे झालं उदाहरण पण असं स्वत:च्या बाबतीत तुम्ही शोधून काढू शकता की आपली जमा बाजू काय, वजा बाजू काय? ते सगळं नीट मांडा स्वत: पुढे.

२. हे समजून घ्या की रिझ्यूम कसा लिहायचा? मुलाखत देताना लागणाऱ्या प्रश्नांची काय उत्तरे द्यायची. त्यातून कळेल की तुम्ही करिअरच्या रेड, ऑरेंज किंवा ग्रीन झोनमध्ये आहात. त्यातून तुम्हाला आपलं करिअर घडवण्याचा आराखडा तयार करता येईल. काय केलं तर आपल्याला मार्ग दिसेल, हातातल्या कौशल्याचा वापर होईल याचा विचार करा.

३. महत्त्वाचे म्हणजे moocs आणि मोबाईलचा वापर करुन करिअर गुगल प्लस प्लस करिअर घडवणं. त्यात कॉम्बिनेशनल लर्निंग येते. म्हणजे सहपदविका / सहपदवी मिळवणे किंवा कौशल्य मिळवणे. उदा. कॉमर्सच्या लोकांनी नुसतं टॅली शिकण्यापेक्षा ‘R’ हे पॅकेज सुद्धा शिकावे. कला क्षेत्रातल्या आट्रर्सवाल्या तरुणांनी कंटेट रायटिंग, परकीय भाषा शिकणे अशी पूरक कौशल्य सुद्धा शिकावी. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. कौशल्य शिकण्यातून तुम्ही हाती असलेला वेळ सत्कारणी लावू शकता.

४.मात्र त्यासाठी हवी स्वयंअध्ययनाची तयारी. सवय. सह कौशल्याची निवड. त्यातून तुमचं आत्मनिर्भर करिअर घडेल. हे सारं हातात असेल, उत्साह असेल तर येत्या गिग इकॉनॉमिक काळात तग धरता येईल. त्याला पर्याय नाही.

(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर कौन्सिलर आहेत.)
bhooshankelkar@hotmail.com
 

Web Title: Retraining, reskilling is important to get retain a job in the 'post covid' world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.