SBI मध्ये १००० हून अधिक पदांसाठी भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख आली जवळ, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 03:26 PM2024-08-12T15:26:35+5:302024-08-12T15:27:14+5:30
SBI Recruitment 2024 : अर्ज करण्यासाठी उमेदवार एसबीआयच्या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
SBI Recruitment 2024 : नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडियानं ( SBI) नोकरीसाठी भरतीची अधिसूचना जारी केली. त्यानुसार बँकेत बंपर पदे भरण्यात येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया आता लवकरच संपणार आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना बँकेत काम करायचं आहे, त्यांनी एसबीआयच्या या भरतीसाठी लवकर अर्ज करणं गरजेचं आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवार एसबीआयच्या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे एसबीआयमध्ये ११०० हून अधिक पदे भरली जाणार आहेत. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. २४ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२४ निश्चित करण्यात आली आहे.
या भरती मोहिमेद्वारे, बँक व्हीपी वेल्थ रेग्युलरच्या ६०० जागा, रिलेशनशिप मॅनेजर एआरएम रेग्युलरच्या १५० जागा, रिलेशनशिप मॅनेजर एआरएम बॅकलॉगच्या १२३ जागा, व्हीपी वेल्थ बॅकलॉगच्या ४३ जागा, इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट रेग्युलरच्या ३० जागा, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर बॅकलॉगच्या २६ जागा, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर रेग्युलरच्या २३ जागा, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड रेग्युलरच्या ११ जागा, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड बॅकलॉगच्या ११ जागा भरल्या जातील.
याशिवाय या भरती मोहिमेत रिजनल हेड बॅकलॉगच्या ४ जागा, रिजनल हेड रेग्युलर, सेंट्रल रिसर्च टीम (प्रोजेक्ट लीड) रेग्युलर, सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) रेग्युलर व प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस) रेग्युलरसाठी प्रत्येकी २ जागांची भरती केली जाणार आहेत. तसेच, मोहिमेद्वारे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर रेग्युलरसाठी एक जागा भरली जाईल.
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना ७५० रुपये भरावे लागतील. त्याच वेळी, SC, ST आणि अपंग उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.