सणासुदीसाठी भरणार सहा लाख नवीन कर्मचारी; हंगामी रोजगारात ४० टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 11:00 AM2022-09-13T11:00:46+5:302022-09-13T11:01:06+5:30
३० टक्क्यांपर्यंत अधिक प्रोत्साहन भत्ता, बोनस आणि राहण्याची सोयही
नवी दिल्ली : यंदाच्या सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्ससह एफएमसीजी, वाहन व किरकोळ विक्री क्षेत्रातील विक्रीत २५ ते ३० टक्के तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामी नोकऱ्याही ४० टक्क्यांनी वाढणार आहे. त्यासाठी कंपन्यांनी नोकर भरतीची तयारी चालविली आहे.
कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे यंदा प्रथमच निर्बंधमुक्त सण साजरे होत आहेत. त्याचा लाभ कंपन्यांना होत आहे. स्टाफिंग कंपन्यांनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कर्मचाऱ्यांची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. यंदा सणासुदीच्या काळासाठी पाच ते सहा लाख हंगामी कर्मचारी भरती केले जाण्याची शक्यता आहे. नोकरी सोडण्याचे प्रमाणही वाढलेले असल्यामुळे मनुष्यबळ भरतीसाठी कंपन्यांना नवनवीन मार्ग शोधावे लागत आहेत. त्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांना ३० टक्के अधिक प्रोत्साहन भत्ता-बोनस देत आहेत. त्यांची राहण्याची सोयही करीत आहेत.
सर्वाधिक मागणी कुणाला?
डिलिव्हरी एजंट, डिलिव्हरी पिकर्स, पॅकर्स, शॉर्टर्स, लोडर-अनलोडर, इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिस इंजिनिअर यांना ई-कॉमर्स क्षेत्रातून सर्वाधिक मागणी आहे.
छोट्या शहरांतून भरती?
छोटी शहरे आणि ग्रामीण भागातून कंपन्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ भरती करीत आहेत.
जबरदस्त ऑफर काय?
मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठी कंपन्या अधिक वेतनासह साईन-इन आणि रिटेन्शन बोनस देत आहेत. राहण्याची सोय आणि दीर्घ अवधीचे करार केले जात आहेत.
या क्षेत्रात भरतीची तयारी
ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स, लॉजिस्टिक्स, रिटेल, एफएमसीजी, पर्यटन व अतिथ्य आणि दूरसंचार या क्षेत्रात सर्वाधिक हंगामी रोजगारासाठी भरती होणार आहे.