पैसा रोखीनं खर्च करा आणि व्हा श्रीमंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:55 PM2017-11-06T15:55:58+5:302017-11-06T15:57:10+5:30
खर्च फार होतोय, असं वाटत असल्यास क्रेडिट कार्ड्स, एटीम कार्ड्स काही दिवस ठेवा कडीकुलुपात आणि पाहा..
- मयूर पठाडे
कोणी एकानं तरी आजवर सांगितलं आहे का, की मी जो पैसा कमावतो, तो मला पुरतो, आणखी पैसा मिळविण्याची मला खरोखरच काहीच गरज नाही. अनगदी श्रीमंतापासून ते हातावर पोट असलेल्या कोणाही श्रमिक, कष्टकरी माणसाची, प्रत्येकाची हीच कथा आहे. पैसा कितीही मिळवला तरी तो कमीच पडतो, कमीच वाटतो.
मग हा पैसा जातो तरी कुठे? कुठे आपला पैसा विनाकारण खर्च होतो? त्यावर कसं लक्ष ठेवायचं आणि खिशातून अलगद निसटणारा हा पैसा कसा वाचवायचा?
अनेक फायनान्स प्लानर्सचं याबाबत एकमत आहे, ते म्हणजे आधी आपल्याकडे किती पैसा येतो आणि किती जातो यावर वॉच ठेवा. म्हणजे आधी आपल्या खर्चाचा आणि कमाईचा हिशेब काढा. खर्चापेक्षा कमाई कमी असेल, बरेच लोन्स असतील तर ती अर्थातच प्रत्येकासाठी धोक्याची खूप मोठी घंटा आहे. बºयाचदा असं होतं, कारण आजकाल क्रेडिट कार्ड्स, एटीम कार्ड्स.. यामुळे हाती कॅश नसली तरी चालतं आणि यामुळेही खर्चाचं प्रमाण वाढतं, पण त्याऐवजी एक प्रयोग करून पाहा. काहीही झालं तरी क्रेडिट कार्ड, एटिमला हात लावायचा नाही. आपला सारा खर्च कॅशनं करून पाहा. विशेषत: ज्यांना आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही त्यांनी तरी. अर्थातच ही कार्ड्स वापरू नयेत, ती काही कामाची नाहीत, असं नव्हे, पण प्रयोग म्हणून करून पाहा. ज्यावेळी तुम्ही कॅशनं खर्च करता, पैसा आपल्या हातातून जाताना पाहाता, त्यावेळी आपोआपच त्याबाबत एक जागरुकता येते.. अरे, आपण फार पैसे खर्च करतोय.. ही मात्रा जर तुम्हाला लागू झाली तर नक्कीच ती वापरुन पाहा.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट. आपलं बजेट सेट करा. खर्चाचं. कोणत्या गोष्टींवर आपला जास्त खर्च होतो, त्याची व्यवस्थित नोंद ठेवली तर आपोआपच आपल्याला कळेल, अरे, इथे जर गडबड आहे.. अर्थातच त्यासाठी अनेक प्रकारची अॅप सध्या उपलब्ध आहेत, त्याचा नक्की वापर करा..
बघा, हे काही उपाय करून. कॅशने खर्च करा, तुमचा पैसा वाचेल.. म्हणजेच तुम्ही अधिक श्रिमंत व्हाल!