TATA ग्रुपमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ‘या’ कंपनीत ३ हजार पदे भरणार; महाराष्ट्रातही जागा वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 06:44 PM2022-02-22T18:44:07+5:302022-02-22T18:45:48+5:30
टाटा ग्रुपच्या या कंपनीने गेल्या तिमाहीत सर्वोत्तम कामगिरी केली असून, यापूर्वी १५०० जणांची भरती केली आहे. पाहा, डिटेल्स...
नवी दिल्ली: आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. कोरोना संकट काळातही TATA ग्रुपमधील अनेक कंपन्यांनी जबरदस्त काम केल्याचे दिसून आले. कोरोनामध्ये लाखो रोजगारांवर गदा आली. मात्र, सरकारीसह खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या आता मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करणार आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचा समावेश असून, एका कंपनीत सुमारे ३ हजार जणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
टाटा ग्रुपच्या Tata Technologies ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३ हजारांहून अधिक नवोदितांना कामावर घेण्याची योजना आखत आहे. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास डिजिटल सेवा कंपनीने विस्तारित भरती कार्यक्रमाचा भाग म्हणून आगामी १२ महिन्यांच्या कालावधीत ३ हजारांहून अधिक नवोदितांची भरती करण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत, देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांसह जगभरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये कर्मचारी वाढवण्याची योजना आखली आहे.
कंपनीची क्षमता अनेकपटींनी वाढू शकेल
टाटा टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन हॅरिस यांनी सांगितले की, आम्ही संधी गमावत नाही, हे नमूद करू इच्छितो. यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही आमची गुंतवणूक क्षमताही वाढवत आहोत. यामुळे कंपनीची क्षमता अनेकपटींनी वाढू शकेल, असे ते म्हणाले. याशिवाय, चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीत आम्ही १५०० जणांची भरती केली, यावरून कंपनी या क्षेत्रात किती यशस्वी ठरली आहे, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. या आर्थिक वर्षात आम्ही कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त ३ हजारांहून अधिक लोकांची नियुक्ती करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आताच्या घडीला टाटा टेक्नोलॉजीज ऑटोनॉमस, कनेक्टेड, इलेक्ट्रिफिकेशन आणि शेअर्ड मोबिलिटी आणि डिजिटलमधील गुंतवणुकीमुळे वेगाने वाढत आहे. तसेच नवीन ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहेत. टाटा टेक्नोलॉजीज कंपनीने मागील तिसऱ्या तिमाहीत १,०३४ कोटी रुपयांचे ऑपरेटिंग आणि २०१.२ कोटी नफा नोंदविला आहे. या कंपनीची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.