‘आरोग्य’ची पदभरती महिनाअखेरीस पूर्ण हाेणार; १०,९९८ पदे लवकरच भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 05:51 AM2024-02-12T05:51:32+5:302024-02-12T05:52:16+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे चर्चेचा विषय असतो. त्याबाबत आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक धीरज कुमार यांच्याशी विशेष प्रतिनिधी संतोष आंधळे यांनी केलेली बातचीत...
धीरज कुमार,
आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग
प्रश्न : आरोग्य विभागातील रिक्त पदे केव्हा भरणार ?
गेल्या काही वर्षांपासून या विभागातील पदे रिक्त होती. ती आता भरण्याचे काम सुरू झाले आहे. रिक्त पदे भरण्यासाठी मोठी पूर्वतयारी करावी लागते. अ आणि ब संवर्गातील डॉक्टरांची पदे, क आणि ड संवर्गातील इतर कर्मचाऱ्यांची भरती यावर सगळ्यांचे लक्ष असते. त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी न राहता भरती प्रक्रिया पार पाडावी लागते. विशेष म्हणजे कोरोना काळानंतर शासनाने रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामध्ये क आणि ड संवर्गातील इतर कर्मचाऱ्यांची १०,९९८ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासोबत अ आणि ब संवर्गातील डॉक्टरांची पदेही भरण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत बहुतांश पदे भरलेली दिसून येतील. काही प्रमोशनची ३५० पदे विभागीय निवड समितीमार्फत भरण्याच्या कामाससुद्धा सुरुवात झाली आहे.
प्रश्न : काही महिन्यांपासून संचालकांची पदे रिक्त आहेत ?
संचालकांची दोन पदे भरावयाची आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पदे रिक्त आहेत. मात्र, संचालकपदासाठीची अर्हता असणारे उमेदवार मिळत नाहीत. एक संचालकपद विभागातून भरायचे आहे तर एक पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरायचे आहे. एमपीएससीला यापूर्वीच हे पद भरण्यासंदर्भात पत्र दिले आहे. आम्ही वैद्यकीय शिक्षण विभागाला संचालक पदाबाबत कळविले. तसेच केंद्रीय आरोग्य संस्थांनाही आम्ही पत्र दिले आहे. मात्र, अजूनही सकारात्मक प्रतिसाद लाभलेला नाही.
प्रश्न : रुग्णालयांतील औषध तुटवडा केव्हा संपणार ?
राज्यात औषध आणि यंत्र खरेदीसाठी महाराष्ट्र वस्तू खरेदी प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. त्यांचे दर करार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात जी झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी सुरू करण्यात आली आहे ती पॉलिसी आमच्या रुग्णालयात अनेक वर्षांपासून आहे. आमच्याकडची सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत. प्राधिकरणाला १,००० कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत औषध तुटवड्याचा प्रश्न निकालात निघेल.
प्रश्न : कोणत्या नवीन सुविधा रुग्णालयांत सुरू करणार?
राज्यात स्त्रियांना आरोग्य सेवा देण्यासाठी एकूण २० रुग्णालये कार्यन्वित आहेत. आणखी १४ जिल्ह्यांत २०० खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापण्याचा प्रस्ताव आहे. जालना आणि नाशिक येथे ३६५ खाटांचे मनोरुग्णालय मंजूर केले आहे. ६३ रुग्णालयांत डायलिसिस सेंटर सुरू हाेणार आहे. ३५० डायलिसिस मशीन घेणार आहाेत. १७ जिल्हा रुग्णालयांत एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन घेणार आहाेत. १२ रुग्णालयात कॅथलॅब सुरू हाेणार आहेत. ३० खाटांची चार आयुर्वेद रुग्णालये नागपूर, ठाणे, जालना आणि धाराशिव येथे सुरू करण्यात येणार आहेत.